सतीश सांगळे
कळस : पुणे जिल्ह्यात एकूण १८ कारखाने असून, त्यापैकी १४ कारखाने चालू आहेत. चार कारखाने अद्याप बंदच आहेत. सुरु झालेल्या कारखान्यांनी ३६ लाख मे.टन एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप होऊनदेखील या कारखान्यांनी अद्याप ऊस दराबाबत शांतता बाळगली आहे.
ऊस गेल्यानंतर १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणे बंधनकारक असते. मात्र कारखान्यांनी हा नियम पाळला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील सुरू झालेल्या नऊ सहकारी व पाच खासगी अशा १४ साखर कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता १ लाख १७ हजार आहे.
या साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३६ लाख ५५ हजार गाळप केले असून, ३० लाख ५७ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे सरासरी साखर उतारा ८.३६ मिळाला आहे, मात्र दराबाबत कोंडी कोणीच फोडली नाही.
यशवंत थेऊर, राजगड भोर, घोडगंगा न्हावरे, अनुराज शुगर्स यवत हे ४ कारखाने बंद आहेत. १७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील कारखाने सुरू झाल्यानंतर बारामती अॅग्रो कारखान्याने आतापर्यंत ७ लाख ३८ हजार टन ऊस गाळप केले आहे.
परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप होऊनदेखील या कारखान्यांनी अद्याप ऊस दराबाबत मौन बाळगले आहे. ऊस गेल्यानंतर १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणे बंधनकारक असते. परंतु जिल्ह्यातील एकही कारखान्यांनी हा नियम पाळला नाही.
निवडणुकीमुळे चालूवर्षी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उशिरा सुरू झाला. १५ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली. जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १४ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे, अशी माहिती साखर आयुक्त कार्यालयाने दिली.
ऊस लागवड करत असताना शेतकऱ्याला मोठा खर्च येतो. खते, मशागतीचा खर्च, वाढलेली मजुरी, यात शेतकरी मेटाकुटीला येतो. कारखाना चालकांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३५०० रुपये दराने पहिली उचल द्यायला हवी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
मात्र उसाचा दर आहीर करण्याबाबत कारखानदार गप्प आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसदर जाहीर कधी होणार याबाबत प्रतीक्षा आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी होऊनही कारखानदार ऊसदर जाहीर करत नसल्याने काही शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
चालू गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. मात्र उसाची फारशी वाढ झाली नसल्याने उसाच्या उत्पादनात घट होत असल्याचे चित्र आहे.
आतापर्यंत झालेल्या गाळपामध्ये बारामती अॅग्रोने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सात लाख ३८ हजार टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ५ लाख १९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, तर साखर उतारा सरासरी ६.९४ टक्के एवढा आहे. मात्र सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक साखर उतारा १०.५३ मिळवला आहे.
शेतकरी नेते गप्प
विधानसभा निवडणूक झाल्याने निवांत झालेल्या कारखानदारांकडून ऊसदराबाबत आता कोणीही बोलायला तयार नाहीत. उसाचा दर जाहीर केला नाही तर शेतकरी संघटना यापूर्वी तीव्र लढा उभी करत होत्या. मात्र ऊसदराबाबत जसे कारखानदार गप्प आहेतच, पण शेतकरी संघटनांचे नेतेही गप्प आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखे आहे.
गाळपाची आकडेवारी (टनांमध्ये)
सोमेश्वर (बारामती) ३,३२,६६५
माळेगाव (बारामती) ३,२४,४८०
श्री छत्रपती (भवानीनगर) १२,०१,०९६
विघ्नहर (जुन्नर) १,०५,१३०
श्री संत तुकाराम (मावळ) १,१५,२३५
भीमाशंकर (आंबेगाव) २,७७,८००
श्रीनाथ म्हस्कोबा (दौंड) १,७६,२३५
बारामती अॅग्रो (शेटफळ गढे) ७,३८,९०६
दौंड शुगर (आलेगाव) ६,२६,०१५
व्यंकटेशकृपा (शिरूर) १,७२,१८०
पराग अॅग्रो (शिरूर) १,९३,८६९
साईप्रिया (भीमा पाटस) २,४५,०६१
कर्मयोगी (इंदापूर) ६७,४८५
नीरा भीमा (इंदापूर) १,७९,४५०