Join us

मराठवाड्यातील १५०० शेतकरी, तंत्रज्ञ आणि युवकांना मिळणार कृषी यांत्रिकीकरणाचे प्रशिक्षण 

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 01, 2023 12:35 PM

मराठवाड्यातील १५०० शेतकरी , तंत्रज्ञ आणि युवकांना आता  कृषी यांत्रिकीकरणाचे  प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षणानंतर ‘आत्म निर्भर भारत मिशन’ अंतर्गत ...

मराठवाड्यातील १५०० शेतकरी, तंत्रज्ञ आणि युवकांना आता  कृषी यांत्रिकीकरणाचे  प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षणानंतर ‘आत्म निर्भर भारत मिशन’ अंतर्गत त्यांचे स्वताचे उद्योग, सेवा केंद्र सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे.  

शेतकरी, तंत्रज्ञ आणि ग्रामीण युवकांसाठी 'कौशल्य विकास – कृषि यांत्रिकीकरण' विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने बीडमधील खामगाव  येथे २५ ते २७ जुलै दरम्यान  तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ही  माहिती दिली. 

या कार्यक्रमात  कृषि क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी व नवयुवक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषि अभियांत्रिकी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या “ऊस पाचट व्यवस्थापन तंत्रज्ञान” विषयावरील घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व सीएनएच इंडस्ट्रियल (न्यू- हॉलंड) इंडिया, नवी दिल्ली यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे मा. कुलगुरू, डॉ. इंद्र मणि हे उपस्थित होते. 

देश-विदेशातील विविध नामांकित संस्थासोबत सामंजस्य करार करून विस आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रकल्प राबविल्या जात असल्याचे  कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी  सांगितले. मा. कुलगुरू महोदय यांनी  प्रशिक्षणाची माहिती देतांना संगितले की देशातील कृषि यांत्रिकीकरणात अग्रगण्य असलेली नोएडा येथील सीएनएच इंडस्ट्रियल इंडिया (न्यु हॉलंड) यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला असून  “कौशल्य विकास – कृषि यांत्रिकीकरण प्रशिक्षण” प्रकल्पांतर्गत कृषि यांत्रिकीकरणात शेतकरी आणि ग्रामीण युवक यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.

पुढील कार्यक्रमात डॉ. दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, खामगाव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.  पुढील कार्यक्रमात डॉ. देवराव देवसरकर यांनी सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्व सांगून प्रशिक्षणार्थींना भविष्यात कौशल्य आधारीत रोजगार निर्माण होणार असल्याचे संगितले. तसेच जास्तीत जास्त बेरोजगार तरुण व नवयुवक यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन कौशल्य आधारीत व्यवसाय सुरू करावा असे सुचवले.

या प्रकल्पासोबतच कृषी मधील मजुरांचा तुटवडा, हंगामात मजूर न मिळाल्यामुळे होणारे नुकसान,  मजुरीवरील अतिरिक्त खर्च व वेळ या सर्वांवर एकमेव उपाय म्हणजे कृषी यांत्रिकीकरण आहे असे सुचवत कृषि यांत्रिकीकरणामुळे प्रशिक्षित रोजगार उपलब्ध होऊ शकतो.  कृषि यांत्रिकीकरण ही काळाची गरज असल्याचे सांगत या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त मराठवाड्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकरी व नवयुवक यांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

 गेवराई येथील खामगावमध्ये  झालेल्या प्रशिक्षणात पहिल्या दिवशी कृषीशी निगडीत विविध आधुनिक यंत्रे व औजारांचे  माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. दुसरी दिवशीच्या सत्रात शेतकऱ्यांना  विविध यंत्रे व औजारे यांचे सादरीकरण करून प्रक्षेत्रावर काही यंत्रांची प्रात्यक्षिके दिली.  यंत्रे व औजारे यांचा योग्य वापर, जोडणी व निगा विषयी प्रात्यक्षिक देण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल ची माहिती देऊन कृषि यांत्रिकीकरण योजनेचे अर्ज भरण्याचे प्रात्यक्षिक दिले. शेवटी तीन दिवसीय कार्यक्रमाचे समारोप प्रशिक्षणार्थींचे मनोगत व खामगावचे प्रथम नागरिक श्री. धोंडीराम डिंगरे, सरपंच यांच्या शुभहस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वाटप करून करण्यात आले.

टॅग्स :शेतकरीकृषी विज्ञान केंद्रबीडपीक व्यवस्थापनतंत्रज्ञान