सोलापूर : कोल्हापूर, सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना पैसे तर दिलेच शिवाय १७७० कोटी रुपयांचा बोनस दिला आहे. एफआरपीप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात १२ कोटी व सोलापूर जिल्ह्यात ३९ कोटी ३८ लाख रुपये दिले नसल्याचेही समोर आले आहे.
राज्यात मागील वर्षी साखर हंगाम बराच दिवस लांबला होता. अत्यल्प पाण्यामुळे मागील वर्षी ऊस हंगाम धोक्यात आला होता; मात्र अवेळी पडलेल्या पावसामुळे ऊसवाढ चांगली झाली व सुरू झालेले साखर कारखाने अधिक दिवस चालले व गाळपातही चांगली वाढ झाली.
ऊस क्षेत्र कमी व सुरू झालेल्या साखर संख्या अधिक असल्याने ऊस मिळण्यासाठी एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याची घोषणा कारखाना चालकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार साखर कारखान्यांकडून एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना पैसे तर दिलेच शिवाय जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले.
कोल्हापूर, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १७७० कोटी रुपये एफआरपीपेक्षा अधिक दिल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडील एफआरपी तक्त्यावरुन दिसत आहे.
१६ हजार ३९५ कोटी कारखान्यांना दिले• कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ४६०४ कोटी द्यायचे होते प्रत्यक्षात ४९०७ कोटी रुपये दिले, पुणे जिल्ह्यात ३४९२ कोटी द्यायचे होते प्रत्यक्षात ३९२२ कोटी दिले.• सातारा जिल्ह्यात २७३६ कोटी द्यायचे होते प्रत्यक्षात ३२१८ कोटी दिले.• कोल्हापूर, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे १४ हजार ६२५ कोटी द्यायचे होते; मात्र कारखान्यांनी १६ हजार ३९५ कोटी ऊस उत्पादकांना दिले आहेत.