Join us

राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांना प्रमोशन; कृषी विभागाला नवे आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:26 IST

Krushi Ayukta Pune राज्य सरकारने मंगळवारी १८ आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली. सध्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची बदली कृषी आयुक्त्त म्हणून करण्यात आली आहे.

मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी १८ आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली. राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी यांना पदोन्नतीसह अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सचिवपदी बदली केली आहे.

इतर १७ अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना त्यांना सध्याच्याच पदावर कायम ठेवले आहे. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी, दिनेश वाघमारे यांना प्रधान सचिव पदावरून अपर मुख्य सचिव श्रेणीत पदोन्नती देण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना यांना प्रधान सचिवपदी पदोन्नती देण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक विमला आर. यांना त्याच पदावर ठेवत पदोन्नती देण्यात आली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना पदोन्नती देऊन त्याच पदावर कायम ठेवले आहे. राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक ए. बी. धुळाज यांना याच पदावर पदोन्नती दिली आहे.

सोलापूर महानगर पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनाही पदोन्नती दिली असून त्याच पदावर कायम ठेवले आहे. डॉ. अशोक करंजकर यांना पदोन्नतीसह राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केली आहे.

महाराष्ट्र कृषी संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सदस्य सचिव रावसाहेब भागडे यांना सध्याच्याच पदावर ठेवत पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सेवेत गेलेल्या निधी चौधरी आणि पीयूष सिंग यांनाही राज्य सरकारने पदोन्नती दिली आहे.

मिलिंद बोरीकर, शंतनू गोयल, रवींद्र बिनवडे, दीपक सिंगला, डॉ. कुणाल खेमनार या अधिकाऱ्यांना सिलेक्शन ग्रेडमध्ये पदोन्नती देण्यात आली आहे.

सूरज मांढरे नवे कृषी आयुक्त▪️पुण्यातील चार महत्त्वाच्या आयुक्त दर्जा असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात कृषी, शिक्षण, नोंदणी महानिरीक्षक व महिला व बालविकास आयुक्त यांचा समावेश आहे.▪️कृषी व महिला व बालविकास आयुक्तांना पुण्यातच पदनियुक्ती देण्यात आली. तर, नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांची बदली केली मात्र नियुक्ती देण्यात आलेली नाही.▪️सोनवणे यांच्या जागी सध्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांची नियुक्त्ती करण्यात आली आहे तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले सचींद्र प्रतापसिंह यांच्याकडे शिक्षण आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.▪️सध्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची बदली कृषी आयुक्त्त म्हणून करण्यात आली आहे. तर सध्याचे महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे यांची मुंबईत मंत्रालयात बदली करण्यात आली.▪️बिनवडे यांचीही गेल्या वर्षीच कृषी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांनाही वर्षभराच्या आतच नोंदणी महानिरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :सरकारराज्य सरकारशेती क्षेत्रपुणेआयुक्तमहाराष्ट्रमहसूल विभाग