यादवकुमार शिंदे
खरिपाच्या पीकविम्यासाठी सामूहिक क्षेत्रातील पीकविमा काढलेल्या १८ हजार ५४० शेतकऱ्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांचे संमतीपत्र न जोडल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील कपाशी, मका, सोयाबीनसह इतर पिकांचे पीकविम्याचे प्रस्ताव पीकविमा कंपनीने अपात्र ठरविले आहेत. अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या सीएससी केंद्राकडे पाठविल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.
दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या सोयगाव तालुक्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी कपाशी, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, तूर आदी खरीप हंगामातील पिकांचा २०२३ वर्षाचा विमा काढलेला आहे.
खरिपाचा पीकविमा मंजूर होण्याचा कालावधी असताना पीकविमा कंपनीने ऐनवेळी सामूहिक क्षेत्रातील पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी संमती न दिल्याने प्रस्ताव रद्द केले आहेत. त्यामुळे तालुक्यात महसुली दप्तरीनिहाय सामहिक क्षेत्र असलेल्या १८ हजार ५४० शेतकऱ्यांना खरिपाच्या पीकविम्याबाबत आर्थिक फटका बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आधीच दुष्काळाच्या झळा गंभीर होत आहेत. त्यात रब्बीच्या हंगामासह उन्हाळी पिकेही उन्हाच्या तीव्रतेने होरपळत आहेत. अशाही स्थितीत पीकविमा कंपनीने नवीनच फंडा वापरून सामूहिक क्षेत्राच्या संमतीचे कारण पुढे करत तालुक्यात प्रमुख पिकांचे पीकविमा प्रस्ताव नामंजूर केले आहेत.
शेतकरी संतप्त
ऐन निवडणुकीच्या कालावधीत पीकविमा कंपनीने पीकविम्यासाठी शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्याचा गोंधळ घातला आहे. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्याची वेळ आलेली असताना ऐनवेळी हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
संभ्रम वाढला
ज्या ठिकाणावरून शेतकऱ्यांनी पीकविमा भरला, त्याच महा ई सेवा केंद्र, सीएससी केंद्राच्या पोर्टलवर पीकविमा अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या आहेत. याबाबत बँकांना सुद्धा कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत.
विमा कंपनीच्या समन्वयकाची भेट घेणार
खरीप पीकविम्याबाबत अपात्र केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांची माहिती मिळाली आहे. याबाबत संबंधित कंपनीशी लेखी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. ऐनवेळी हा निर्णय अपेक्षित नाही. विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकाची भेट घेऊन खुलासा मागवून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना कारवाईसाठी अहवाल पाठविण्यात येईल. - मदन सिसोदिया, तालुका कृषी अधिकारी सोयगाव