वसंत भोईर
वाडा : राज्य सरकारने वैतरणा खोऱ्यातील १९.९० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे.
मात्र, वैतरणा खोऱ्यातील गावे पिण्याचे पाणी व सिंचनाच्या पाण्यापासून वंचित असताना हे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याच्या निर्णयाला आता स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.
वाडा तालुक्यातून तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगाई अशा पाच नद्या वाहतात. या नद्यांच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने मार्च-एप्रिल महिन्यातच त्या कोरड्या पडतात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता येत नाहीत.
यातील वैतरणा व पिंजाळ या नद्यांवर बंधारे बांधण्यात आल्याने बंधारे बांधलेल्या ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध होते. उर्वरित ठिकाणी मात्र नदी कोरडी पडते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पाणी वळवणे शक्य?
• जलसंपदा विभागाने काडलेल्या परिपत्रकात, पश्चिम वाहिनी नदीखोऱ्यांतून (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवण्याबाबत प्राथमिक अभ्यास करण्यासाठी एकात्मिक राज्य जल आराखड्यानुसार समिती स्थापन करण्यात आली होती.
• गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक (छत्रपती संभाजीनगर) हे या समितीचे अध्यक्ष होते.
• या समितीच्या अहवालानुसार पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातील उल्हास खोऱ्यातून ३४.८०, तर वैतरणा खोऱ्यातून १९.९० टीएमसी असे एकूण ५४.७० टीएमसी अतिरिक्त पाणी वळविणे शक्य असल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे.
अंदाजपत्रकासही मंजुरी
• या अहवालानुसार कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक (ठाणे) यांनी ३ जुलै रोजी प्रस्ताव सादर केला.
• त्याअनुषंगाने या योजनेचे सर्वेक्षण, अन्वेषण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामाच्या ६१ कोटी ५२ लाख ३० हजार १४६ इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
• यासंदर्भातील शासन निर्णय जलसंपदा विभागाच्या प्रधान उपसचिव जया पोतदार यांच्या सहीने काढण्यात आला असून या निर्णयामुळे वैतरणा खोऱ्यातील गावांत मात्र खळबळ माजली आहे.