हरित हायड्रोजन निर्मितीसाठी महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या सात कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत.यामधून ६४ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज(दि.२९) सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासन आणि हायड्रोजन उर्जा निर्मिती करणाऱ्या विकासकांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले.यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित हायड्रोजनवर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र सरकारच्या हरित हायड्रोजन मिशनच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य शासनाने हरित हायड्रोजन धोरण-२०२३ प्रकाशित केले. यामध्ये २०३० पर्यंत ५०० केटीपीए इतका हरित हायड्रोजन निर्मितीचे उदिष्ट आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे हरित हायड्रोजन विकासकांना विविध अनुदान सवलती देऊ केलेल्या आहेत.