पुणे : दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारची योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. केंद्राच्या या योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधीचाही हप्ता त्याचवेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. पण या योजनेच्या १६ व्या हप्त्यापासून राज्यातील अनेक शेतकरी अपात्र ठरले आहेत.
कृषी विभागाच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचे ८८.८२ लाख शेतकरी कुटुंबांना १९८३.७२ कोटी रूपये १६ व्या हप्त्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. तर राज्यातील २ लाख १० हजार ५८० शेतकऱ्यांना १६ वा हप्ता मिळाला नसून त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत. पण अशा शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाहीये. तांत्रिक अडचणींमुळे किंवा ईकेवायसी केली नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत.
काय कारणे?
ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खात्याला आधार लिंक केले नाही, ईकेवायसी केले नाही, काही कारणास्तव खाते बंद पडलेले आहे किंवा नोंदणी करण्याची प्रोसेस पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत.
काय करावे?
ज्या शेतकऱ्यांची ईकेवायसी करायची राहिली असेल अशा शेतकऱ्यांनी ईकेवायसी, आधार लिंक आणि बँक खाते सुरू आहे का याची खात्री करून घ्यावी. जरी १६वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नसेल तरी ईकेवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांना हे पैसे पुढच्या हप्त्यावेळी किंवा त्याआधी वितरीत करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरून जाण्याचे किंवा चिंता करण्याचे कारण नाही.
दरम्यान, राज्याच्या कृषी विभागाकडून १० मार्च पर्यंत ईकेवायसी, आधार सिडींग, नवीन नोंदणी करणाऱ्या लोकांना मान्यता देणे यासंदर्भातील मोहीम राबवण्यात आली असून सीएससी केंद्र व बँके मार्फत कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्तालय स्तरावरून देण्यात आल्या आहेत.