Join us

गारपिटीने २० कोटीचे नुकसान; रब्बी पिके, फळबागांना मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:47 AM

दोन दिवसांत होतील पंचनामे

श्यामकुमार पुरे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात ११ व १२ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने फळबागा, शेडनेट, उन्हाळी पिके यांचे एकूण २० कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. यात ३०० हेक्टरवरील रब्बी पिके, फळबागा उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज आहे.

सिल्लोड तालुक्यात ११ व १२ एप्रिलला वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे तालुक्यातील आसडी, रहिमाबाद, अन्वी, मंगरुळ, पालोद येथे आंबा व निम्बुच्या जवळपास ६० शेतकऱ्यांच्या २७ हेक्टर क्षेत्रावरील फळबागा उद्ध्वस्त झाल्या. आसडी, रहिमाबाद, अन्वी, मंगरुळ, पालोद, सारोळा, चिंचपूर, चांदापूर, डोंगरगाव, मांडणा, परिसरातील जवळपास ३०० हेक्टरवरील बागायत क्षेत्राचे नुकसान झाले.

तसेच मका, बाजरी, कांदा सिड्स, भाजीपाला याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात १०० शेडनेटचे नुकसान झाले. एका शेडनेटसाठी शासनाने तब्बल १८ लाख ५० हजारांची पोखरा अंतर्गत शेतकऱ्यांना सबसिडी दिली होती; मात्र त्यातील १०० च्या वर शेडनेट हवेत पुर्णपणे उदध्वस्त झाले आहेत. याच्या नुकसानीचा आकडाच १८ कोटी ५० लाखांच्या घरात जात आहे. या शेडनेटमध्ये अनेक शेतकऱ्यांनी मिरचीचे रोप लावले होते. ते पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे.

याशिवाय काही शेतकऱ्यांची तोडणीला आलेली मिरची पुर्णतः खाली पडल्याने पिवळी होऊन सडली आहे. त्यात जवळपास ५० शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक लाखांचे नुकसान झाले आहे. सिरसाळा येथील नामदेव चोरमले यांच्या राहत्या घरावरील टिनपत्रे वादळी वाऱ्याने शुक्रवारी उडून गेले. यावेळी त्यांच्या घरातील आरव मनीष चोरमले हा ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला, तर उंडणगाव परिसरात वीज पडून सिल्लोड येथील दुचाकीस्वार शेख जाबेद शेख रऊफ (वय २२) हा ठार झाला आहे तसेच हाजराबी ऊर्फ शबाना शेख रऊफ (४५) ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

दोन दिवसांत होतील पंचनामे

तहसीलदार रूपेश खदारे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे यांनी पंचनामे करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार १० पैकी ५ गावांमधील नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.

उर्वरित गावांमधील नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत पूर्ण केले जातील व त्यानंतर अहवाल शासनाला दिला जाईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :पाऊसवादळशेतीशेतकरी