मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – वैयक्तिक शेततळे (मागेल त्याला शेततळे) घटकाकरिता सन 2023-24 मध्ये शासनाकडून 80 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून आतापर्यंत 7 हजार 316 शेततळ्यांकरिता शेतकऱ्यांना 50.81 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. तसेच 1 हजार 665 शेतकऱ्यांचे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळेकरिता शासनाकडून आणखी 20 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे खोदकामासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. तसेच शेततळ्यास प्लॅस्टीक अस्तरीकरण करण्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत वेगळे अनुदान देण्यात येते.
या योजनेची अंमलबजावणी महा डीबीटी पोर्टलवरुन करण्यात येते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.