अशोक डोंबाळेतीस ते चाळीस वर्षांपूर्वीच्या कालबाह्य विद्युत तारा, रोहित्रांमुळे सांगली जिल्ह्याच्या वीज पुरवठ्यात अडथळ्यांची मालिका सुरू आहे. महावितरणच्या कालबाह्य यंत्रणेचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून, अखंडित वीज पुरवठाच होत नाही. ग्राहकांच्या या तक्रारींची दखल घेऊन महावितरणने जिल्ह्यात नवीन सात हजार विद्युत रोहित्र आणि उपकेंद्रांसाठी दोन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे.महावितरणने शहरातील वीज पुरवठा सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी नवीन रोहित्रे बसविली आहेत. पण, ग्रामीण भागात विद्युत वाहिनींसह रोहित्रांची क्षमता गेल्या तीस वर्षांत वाढविली नाही. यामुळे ग्रामीण भागात अखंडित वीज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
१२ कोटी जिल्हा नियोजन देणारसांगली जिल्ह्यात गेल्या ३० ते ४० वर्षांत कृषिपंप, घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत लाखोंने वाढ झाली आहे. पण, या ग्राहकांना वीज पुरवठा करणारी यंत्रणा सक्षम करण्यासाठी विद्युत यंत्रणा सक्षम झाली नाही. सध्या जवळपास दीड हजारांवर रोहित्रांतून सक्षमतेपेक्षा जास्त वीजजोडणी दिली आहे. यापैकी सध्या तातडीने १३५ रोहित्रे बदलण्यासह क्षमता वाढविण्यासाठी १२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे महावितरण कंपनीने पाठविला आहे. येत्या पंधरा दिवसात त्याला मंजुरीही मिळेल.
शेतकऱ्यांना असा मिळणार लाभ
- सध्या महावितरणविरोधात सर्वाधिक तक्रारी ग्रामीण आणि कृषिपंपाच्या ग्राहकांच्याच आहेत.
- या तक्रारींची गंभीर दखल घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विद्युत वाहिनी सक्षम करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे.
- शासनाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दोन वर्षात सात हजार विद्युत रोहित्र नव्याने बसविण्यात येणार आहेत.
- तसेच नव्याने उपकेंद्रेही करण्यात येणार आहेत. यातून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील विद्युत सेवा सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाकडे दोन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. या निधीतून सात हजार नवीन विद्युत रोहित्र वाढविण्यासह काहींची क्षमताही वाढविण्यात येणार आहे. नवीन येणार आहेत. तसेच उपकेंद्रामध्ये मुलभुत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रोहित्रे आणि नवीन उपकेंद्रामुळे ग्रामीण भागामध्ये दर्जेदार वीज पुरवठा होण्यास मदत होईल. त्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरु आहेत.- धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी