Join us

उन्हामुळे २५ टक्के मिरचीची रोपे जळाली; शेतकऱ्यांकडून पुन्हा लागवड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 12:58 PM

मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरासह वडोद तांगडा, धावडा, वालसावंगी, दहीगाव, हिसोडा, अडगाव आदी गावांत विहिरींमध्ये पाण्याची कमतरता असतानादेखील शेतकरी विहीर, बोअरवेल आणि शेततळ्यातील अल्प पाण्यावर ठिंबकच्या साह्याने नगदी पीक म्हणून उन्हाळी मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत.

परंतु, तापमानात वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेली मिरचीची काही कोवळी रोपे जळून जात आहेत. त्या जागी नवीन रोपे तुटा म्हणून लावली जात आहेत. धावडा येथील शेतकरी इक्बाल पठाण यांनी ११ एकरांत पडलेल्या २५ टक्के तुटा लावण्याचे काम हाती घेतले. 

भोकरदन तालुक्यातील शेतकरी एक-दोन एकरात मिरचीची लागवड करण्यासाठी मल्चिंग पेपर, विविध प्रकारची रासायनिक खते, शेणखत, ठिबक संचाची खरेदी करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी मार्च, तर काहींनी एप्रिलमध्ये मिरचीची लागवड केली.

उन्हाळी मिरची जगली पाहिजे, या उद्देशाने अनेकांनी ठिंबकवर लागवड करून सकाळ व संध्याकाळ पाणी देत आहेत. परंतु, तापमान वाढत असल्याने ही मिरचीची रोपे करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शेतात लावलेला खर्च वाया जातो की काय? या चिंतेत सापडले आहेत.

यंदा सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्यामुळे विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी खालावली आहे. त्यातच उन्हाचा अधिक कडाका जाणवत आहे, त्यामुळे ११ एकरांत लावलेली २५ टक्के उन्हाळी मिरचीची रोपे जळून गेली आहेत. त्यामुळे त्या जागी पुन्हा नव्याने रोपे लावली जात आहेत. उन्हामुळे त्याचा नाहक आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. - इक्बाल पठाण, शेतकरी, धावडा

हेही वाचा - अलीकडे का झाले अनेक दूध उत्पादकांचे डेअरी फार्म बंद?