राज्यातील आदिवासींच्या परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी कृषी विभागाकडून ३ लाख ६३ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या या निधीमधून प्रतिकुटुंब अवघे ६ रुपये मिळू शकतील. २०११ च्या जनगणनेनुसार १४ जिल्हयांची लोकसंख्या ५२ हजार ६९० एवढी आहे.
राज्यातील आदिवासी भागांमध्ये कुपोषणाचा प्रश्न मोठा असल्याने दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल आदिवासी व कृषी विभागाला प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यातील १४ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी 3.63 लाख निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.आदिवासी भागातील कुपोषण प्रमाण कमी करणे आणि आदिवासींना पौष्टिक आहार देणे हा या योजनेचे उद्दिष्ट आहे.
कोणत्या जिल्ह्यात ही योजना सुरु?
राज्यातील ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती व गोंदिया या 14 जिल्ह्यातील ‘आदिवासी परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड ’ ही योजना २००३-०४ पासून सुरु आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांतील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी व पौष्टिक आहार पुरविण्यासाठी, आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळांची निवड करून लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यात येते.
निधी आणि आदिवासी लोकसंख्येचं गणित
महाराष्ट्र सरकारच्या २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती व गोंदिया या १४ जिल्हयांची लोकसंख्या ५२ हजार ६९० एवढी आहे.
या योजनेत तरतूद करण्यात आलेला ३.६३ लाखांचा निधी आणि या १४ जिल्ह्यांच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत एका कुटुंबाला परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी ६.८८ रुपये खर्च मिळू शकेल अशी ही तरतूद आहे.