सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वाटप केली जातात. गेल्यावर्षी जिल्ह्यात ४८ बचतगटांना याचा लाभ देण्यात आला. दरम्यान, योजना सुरू झाल्यापासून गेल्या ११ वर्षात अहमदनगर जिल्ह्यात साडेचारशे बचतगटांना लाभ मिळाला आहे.
अकरा वर्षांत ४५० गटांनी घेतला लाभ
या योजनेअंतर्गत २०१२ पासून गत अकरा वर्षांत जिल्ह्यात ४५० स्वयंसहायता बचत गटांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. दरवर्षी साधारण ५० गटांना लाभ देण्यात येतो.
काय आहे योजना?
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर पॉवर टिलरचा पुरवठा करण्याची योजना बंद करण्यात आली. त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना ९० टक्के अनुदानावर ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर) किंवा रोटाव्हेटर, ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
काय-काय मिळणार?
९ ते १८ अश्वशक्तींचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर) किंवा रोटाव्हेटर व ट्रेलरसाठी ९० टक्के अनुदान दिले जाते.
९० टक्के अनुदान
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३.५० लाख आहे. १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर ९० टक्के (कमाल ३.१५ लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.
कोणाला मिळणार लाभ?
- बचत गट नोंदणीकृत असावा व नोंदणी प्रमाणपत्र सोबत जोडावे. बचत गटात किमान १० सदस्य असावेत. गटातील सर्व सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. त्याबाबत स्वयंघोषणापत्र विहित नमुन्यात सादर करावे. बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनु.जाती व नवबौद्ध घटकाचे असावेत. त्याबाबत जातीचे दाखले सादर करावेत.
- बचत गटाचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असावे. योजनेचा स्वहिस्सा १० टक्के (३५ हजार) बचत गट भरण्यास तयार असल्याबाबत हमीपत्र सादर करावे.
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे ?
- बचत गटाचे माविम, आत्मा कृषी विभाग, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान, उमेद अभियानाअंतर्गत बचत गटांची नोंदणी झाल्याबाबत नोंदणी प्रमाणपत्र.
- बचत गटाचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याबाबत पासबुकची छायांकित प्रत.
- बचत गटांची बँकेने प्रमाणित केलेली सदस्यांची फोटोसह यादी.
- बचत गटातील अध्यक्ष, सचिवांसह किमान ८० टक्के सदस्यांचे जातीचे दाखले.
- बचत गटातील सदस्यांचे रहिवासी दाखले/स्वयंघोषणापत्र. - बचत गटातील सदस्याचे आधारकार्ड, रेशनकार्ड
- बचत गट स्थापनेचा ठराव, तसेच मिनी ट्रॅक्टर मिळविण्यासाठी सर्व सदस्यांचा ठराव.
- बचत गटातील सर्व सदस्यांचा बैठकीचा एकत्रित छायाचित्र.