जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कोणतेच क्षेत्र अवघड नाही, हेच येथील डॉ. प्रणिता प्रभाकर ठाकूर यांनी दाखवून दिले आहे. कौटुंबिक परिस्थिती सर्वसाधारण असतानाही असामान्य कर्तृत्व त्यांनी केले आहे. दिल्ली येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची ३० लाख रुपयांची फेलोशिप त्यांना जाहीर झाली असून, यातून सोयाबीन पिकावर त्या संशोधन करणार आहेत. अशी फेलोशिप मिळणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील त्या एकमेव महिला ठरल्या आहेत.
रोग प्रतिकारक, दर्जेदार बियाणे बनविण्याचे ध्येय
सोयाबिन हे महाराष्ट्रातील मुख्य पीक आहे. हे बियाणे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करण्यासाठी संशोधन करणार आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढावी तसेच सोयाबिनमधील मूळ गुणधर्मात वाढ करुन हे बियाणे अधिक दर्जेदार कसे करता येईल, यावर संशोधन केले जाणार आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात संशोधन कार्य करणार असल्याचे डॉ. प्रणिता ठाकूर यांनी सांगितले.
१० संशोधन लेख प्रकाशित
डॉ. प्रणिता ठाकूर यांचे कृषी क्षेत्रातील विविध पिकांवर केलेल्या संशोधनावर १० शोधप्रबंध प्रकाशित झाले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चचर्चासत्रात त्यांनी सहभाग नोंदविला असून, आता सोयाबीनवर केले जाणारे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भारत हा कृषिप्रधान देश असून, येथील संपूर्ण अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रात भरीव संशोधन करण्यास वाव आहे. शेतकऱ्यांना सोयीचे ठरेल असे संशोधन होणे अपेक्षित आहे. कृषी क्षेत्रात अनेक जण पदवी, पदव्युत्तर पदवी घेतात; पण या शिक्षणाचा फायदा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी किती होतो, हे तेवढेच महत्त्वाचे आहे.
नांदेड येथील प्रणिता प्रभाकर ठाकूर यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर केरळ येथील कृषी विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. प्लांट बायोटेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर पदवी मिळविली. मॉल्युक्युलर बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी विषयात त्यांनी अत्यंत कमी काळात पीएच.डी. ही आचार्य पदवी मिळविली आहे. कृषी क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत अनेक संशोधने केली आहेत. पीएच.डी.चा प्रबंध सादर करताना त्यांनी कापूस पिकावर संशोधन केले. सध्या त्या मुंबई येथील डी. वाय. पाटील विद्यापीठात प्रोफेसर असून, केंद्र शासनाचा सर्वांत मोठा महिला शास्त्रज्ञ पुरस्कार त्यांना मिळाला असून, सोयाबीन या पिकावर संशोधन करण्यासाठी 30 लाख रुपयांची फेलोशिप त्यांना जाहीर झाली आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात त्या सोयाबीनवर संशोधन करणार आहेत.
चारही मुलांना केले उच्च शिक्षित
परभणी जिल्ह्यातील बरबडी (ता. पालम) येथील प्रभाकर राघोजी ठाकूर हे १९८५ मध्ये नांदेडमध्ये आले. उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. भाजी विक्री करुन आणि दुकानावर काम करीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविला.
वडिलांनी केलेल्या कष्टाची जाण ठेवत मुलांनी देखील उच्च शिक्षण घेत अतुलनीय कामगिरी केली आहे. त्यांची एक मुलगी पोलिस उपनिरीक्षक, एक अभियंता तर डॉ. प्रणिता कृषी क्षेत्रातील उच्चशिक्षित झाली आहे. तसेच मुलगा एमपीएससी परीक्षेची पहिली फेरी उत्तीर्ण झाला आहे.