सुनील चरपेनागपूर : यावर्षी देशभरातील कापसाच्या उत्पादनात माेठी घट झाली असून, उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. कापसाचा सरासरी उत्पादन खर्च प्रतिक्विंटल १० हजार रुपये असून, दर मात्र ७ हजार रुपयांच्या आसपास मिळत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २,४०० ते ३,२०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
देशातील कापसाचे लागवड क्षेत्र ३.९४६ लाख हेक्टरने घटले असून, महाराष्ट्रात केवळ ५३ हेक्टरने वाढले आहे. देशात कापसाचे सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रात असून, त्याखालाेखाल गुजरात आणि तेलंगणात कापसाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुजरातमध्ये कापसाचे लागवड क्षेत्र १.३३५ लाख हेक्टरने वाढले तर तेलंगणामध्ये २.११४ लाख हेक्टरने घटले आहे.
उत्पादन घटण्याची व खर्च काढण्याची कारणेयावर्षी पावसाचा खंड, गुलाबी बाेंडअळीसह अन्य किडी व राेगांचा प्रादुर्भाव, परतीचा व अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे संपूर्ण देशभरात कापसाचे उत्पादन घटले आहे. पीक वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चामुळे कापसाच्या उत्पादन खर्चात मात्र माेठी वाढ झाली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत टप्प्याटप्प्याने कापूस विकत असल्याने बाजारातील आवकही मंदावली आहे.
देशातील कापसाचे पेरणी क्षेत्रसन २०२३-२४ - १२५.०७६ लाख हेक्टरसन २०२२-२३ - १२९.०२२ लाख हेक्टर
कापसाचे राज्यनिहाय पेरणी क्षेत्र (लाख हेक्टर)वर्ष - महाराष्ट्र - गुजरात - तेलंगणा२०२३-२४ - ४२.३४५ - २६.८२४ - १८.१२२२०२२-२३ - ४२.२९२ - २५.४८९ - २०.२३६
कापसाचे सरासरी दर (रुपये)वर्ष - दर - एमएसपी (लांब धागा)२०२३-२५ - ६,८०० - ७,०२०२०२२-२३ - ७,७७६ - ६,३८०२०२१-२२ - ८,९५८ - ६,०२५२०२०-२१ - ५,४३० - ५,८२५२०१९-२० - ५,३८७ - ५,५८०
कापसाचा उत्पादन खर्चयावर्षी काेरडवाहू कापसाचा उत्पादन खर्च प्रति एकर २८ ते ३० हजार रुपये असून, सरासरी उत्पादन एकरी तीन क्विंटल असल्याने काेरडवाहू शेतीतील कापसाचा उत्पादन खर्च हा प्रतिक्विंटल किमान १० हजार रुपये आहे. ओलिताखालील कापसाचा उत्पादन खर्च प्रति एकर ५० ते ५५ हजार रुपये असून, सरासरी उत्पादन सहा क्विंटल आहे. त्यामुळे ओलिताखालील कापसाचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल किमान ९,२०० रुपये आहे.
पदरी पडणारा ताेटासध्या कापसाला सरासरी ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे जिरायती (काेरडवाहू) कापूस उत्पादकांना प्रतिक्विंटल ३,२०० रुपये तर बागायती (ओलिताखालील) कापूस उत्पादकांना प्रतिक्विंटल किमान २,४०० रुपयांचा ताेटा सहन करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे भिजलेल्या कापसाला ५ ते ६ हजार रुपये दर मिळत असल्याने हा ताेटा ४ ते ५ हजार रुपयांवर गेला आहे. विशेष म्हणजे, भिजलेला कापूस हा पहिल्याच वेचणीचा असून, दर्जेदार असतो.