राजाराम लोंढे
कोल्हापूर : राज्यातील ३३ साखर कारखान्यांचा हंगाम संपला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४६ लाख टनाने राज्याचे गाळप कमी झाले आहे. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करताना सर्वच कारखान्यांची दमछाक होत असून, येत्या पंधरवड्यात बहुतांशी कारखान्यांची धुराडी थंडावणार आहेत.
राज्यात यंदा १०३ सहकारी व १०४ खासगी, अशा २०७ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. 'कोल्हापूर' विभागात ऊस दराच्या आंदोलनामुळे नोव्हेंबर महिन्यात गतीने गाळप होऊ शकले नाही. यंदा पाऊस कमी असल्याने उसाची वाढ झाली नाही, त्यात अपेक्षित थंडीही पडली नसल्याने उसाला वजन मिळालेले नाही.
त्याचा परिणाम कारखान्यांच्या गाळपावर झाला असून, आतापर्यंत राज्यात ९ कोटी ६६ लाख ८२ हजार टन गाळप झाले आहे. त्यांनी ९ कोटी ७७ लाख ८६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या पेक्षा गाळप कमी झाले असले तरी ०.१७ टक्क्यांनी उताऱ्यात वाढ झाली आहे.
सर्वाधिक गाळप करणारे पहिले दहा कारखाने
बारामती अॅग्रो, इंदापूर २०,५८,१४०
दौंड शुगर १७,१५,३१०
विठ्ठलराव शिंदे, माढा १५,९६,१८०
जवाहर, हुपरी १४,५९,१००
इंडीकॉम डेव्हलपर्स, अंबिकानगर कर्जत १३,१९,६४०
कृष्णा, रेठरे १२,६९,८१०
दत्त, शिरोळ ११,७५,०२०
वारणा ११,५९,१७५
सोमेश्वर, बारामती११,२९,३६३
माळेगाव, बारामती ११,०५,५१०
'बारामती अॅग्रो'चे उच्चांकी गाळप
राज्यात बारामती अॅग्रो, इंदापूरने तब्बल २० लाख ५८ हजार १४० टनाचे गाळप केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ९.११ टक्के उतारा राखण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या पाठोपाठ १७ लाख १५
हजार ३१० टन गाळप दौंड शुगरने केले आहे. साखर उताऱ्यात कोल्हापुरातील दालमिया शुगर (१२.९८ टक्के), कुंभी कासारी- कुडिने (१२.८७ टक्के) व राजारामबापू वाटेगाव (१२.६१ टक्के) आघाडीवर राहिले आहेत.