Join us

पश्चिम वऱ्हाडात दोन दिवसात ३३२ जनावरे ठार, अवकाळी पावसामुळे सर्वाधिक पशुधनाची हानी....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 4:00 PM

शासकीय अहवालानुसार २ दिवसातील असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पश्चिम वन्हाडातील ३३२ जनावरे ठार झाली. यामध्ये मेंढरांसह इतर गुरांचा समावेश आहे. अवकाळी पावसाने अकोला व वाशिम जिल्ह्यात ११० मेंढरांचा बळी घेतला आहे. अकोला जिल्ह्यात २० मेंढरांचा मृत्यू झाला तर वाशिम जिल्ह्यात ९० मेंढरे ठार झाली आहेत. ही आकडेवारी शासकीय अहवालानुसार २ दिवसातील असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक पशुधनाची हानी बुलढाणा जिल्ह्यात झाली असून हा आकडा २२२ वर पोहोचला आहे. खामगाव अकोल्यात २०, वाशिममध्ये ९० मेंढरांचा मृत्यू झाले.

■ अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात गायगाव शिवारात वारोडी बु. (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील इसाराम बिचकुले, तान्हाजी गोरे, सोना गजानन भिसे, श्यामराव बिचकुले आदींच्या मालकीच्या २० मेंढ्या दगावल्या, तर पातूर तालुक्यातील वहाळा येथील सारंगधर मोरे यांच्याकडील एक गाय दगावल्याची माहिती आहे.

■ वाशिम जिल्ह्यात २६ व २७ नोव्हेंबर रोजी वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटही झाली, तर २८ नोव्हेंबर रोजीही जिल्हाभरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. सोमवारी सकाळपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे ९० मेंढ्यांचाही मृत्यू झाला.

तालुक्यातील विविध गावांत मंगळवार दुपारपर्यंत लहान व मोठी मिळून १८१ जनावरे दगावली आहेत. त्यामध्ये मेंढ्यांसह गायी, वासरांचा समावेश आहे. मृत जनावरांचे पशुसंवर्धन विभागाकडून शवविच्छेदन सुरू आहे. रविवारी रात्रीपासून परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यातच तापमानातही प्रचंड घट झाल्याने हवेत गारठा वाढला आहे. 

या पावसाचा फटका जनावरांना बसत आहे. त्यामुळे १४१ मोठ्या मेंढ्या, १४ लहान मेंढ्या, १८ गायी व ६ वासरांचा समावेश आहे. जनावरांचा मृत्यू झाल्याची ही संख्या मोठी असल्याने बुलढाणा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लोणे, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. सोनोने यांनी या गावांत भेट दिली. तसेच विभागाच्या वतीने तेथेच शवविच्छेदन केले जात आहे. तालुक्यातील पिंपळचोच, टाकळी तलाव, टेंभूर्णा, आवार, निरोड, नागझरी बु, वाकुड, पिंपरी गवळी, शिराळा, हिवरखेड, नांद्री, चिंचखेड, गणेशपूर, ढोरपगाव, कवडगाव, झोडगा या गावांमध्ये पशुधनाचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :गारपीटपाऊसहवामान