पुणे : उसतोड कामगारांच्या तोडणी दरामध्ये वाढ करावी आणि मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी उसतोड संघटना आणि कामगारांचे मागील अनेक दिवसांपासून आंदोलने सुरू होते. साखर महासंघ, सरकारी प्रतिनिधी आणि आंदोलकांच्या आजच्या बैठकीनंतर या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे.
दरम्यान, उसतोडणीसाठी उसतोड मजुरांना प्रतिटन २३८ रूपये मिळत होते. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून या दराच्या ३४ टक्के रक्कम वाढीव मिळणार आहे. त्याचबरोबर मुकदमांच्या कमिशनमध्ये १ टक्क्यानी वाढ करण्यात आली असून ते आता २० टक्के करण्यात आले आहे. या निर्णयामुळे उसतोड मजुरांना फायदा होणार असून आंदोलकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
उसतोड दरामध्ये ६० टक्के वाढ करण्यात यावी आणि मुकादमांचे कमिशन १९ टक्क्यावरून २५ टक्के करण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली होती पण साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दांडेगावकर, शरद पवार, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील यांच्या बैठकीमध्ये अखेर तोडगा निघाला.
आंदोलक आणि साखर महासंघाच्या या प्रश्नात शरद पवार यांनी मध्यस्थी केली. ही दरवाढ येत्या ऑक्टोबर महिन्यापासून लागू होणार असून कामगारांना त्याचे वाढीव पैसे मिळणार आहे. उसतोड मजुरांसाठी ही महत्त्वाची बाब असून वर्षाची सुरूवात त्यांच्यासाठी चांगली झाली आहे.
येणाऱ्या तीन वर्षांसाठी असतील हे दर
हा करार या वर्षीची हंगाम आणि येणाऱ्या दोन गळीत हंगामासाठी असणार आहे. त्यामुळे मजुरांना यंदाच्या गळीत हंगामाचे सुरूवातीपासून वाढीव दराने पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर साखर संघाकडून मुकादमांकडे किंवा कामगारांकडे राहणारे पैसे पोलिसांच्या कचाट्यात न सापडता द्यावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. संघाने केलेल्या सूचना संघटनाने मान्य केला असून या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.