Join us

Fertilizers Scam: खतांच्या नावाखाली विकली ३४०० बॅग माती; 'या' कंपनीने शेतकऱ्यांना लावला ५० लाखांचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:17 PM

Fertilizers Scam: पुणे येथील रामा फर्टिकेम कंपनीने गुजरातमध्ये उत्पादित डीएपी व एनपीके १०:२६:२६ या रासायनिक खतांच्या नावाखाली चक्क दाणेदार माती अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकल्याचे उघड झाले आहे. या खतांचे नमुने अहवाल अप्रमाणित आले आहेत. सहा तालुक्यांत विकल्या गेलेल्या ३४०० बॅग बनावट खतांतून कंपनीने शेतकऱ्यांना किमान ५० लाखांचा चुना लावला आहे.

पुणे येथील रामा फर्टिकेम कंपनीने गुजरातमध्ये उत्पादित डीएपी व एनपीके १०:२६:२६ या रासायनिक खतांच्या नावाखाली चक्क दाणेदार माती अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकल्याचे उघड झाले आहे. या खतांचे नमुने अहवाल अप्रमाणित आले आहेत. सहा तालुक्यांत विकल्या गेलेल्या ३४०० बॅग बनावट खतांतून कंपनीने शेतकऱ्यांना किमान ५० लाखांचा चुना लावला आहे.

डीएपी या रासायनिक खताची ५० किलोची बॅग १३५० रुपयांना व एनपीकेची बॅग १४७० रुपयांना बाजारात विकली जाते. अनेक शेतकरी पेरणीसोबतच या खतांची मात्रा देतात. त्यामुळे रासायनिक खतांच्या नावावर चक्क माती विकून या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने शेतकऱ्यांना खतांचे पैसे परत मिळायला पाहिजे, अशी मागणी होत आहे.

कृषी उपसंचालक उज्ज्वल आगरकर यांनी मंगरूळ चव्हाळा येथील एका कृषी केंद्रातून एनपीकेचा नमुना व जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी मार्डा येथील कृषी केंद्रातून डीएपीचा नमुना घेऊन तपासणीला पाठविला होता.

अहवाल अप्रमाणित आल्याने कंपनीचा गोरखधंदा उघडकीस आला. यानंतर एसएओ राहुल सातपुते यांच्या निर्देशान्वये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सागर डोंगरे यांनी शहर कोतवालीत सोमवारी रात्री तक्रार दाखल केली. त्यावरून कंपनीचे जबाबदार अधिकारी विकास नलावडे (४८, काष्ठी-श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध फसवणुकीसह खत नियंत्रण कायद्यान्वये विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा - निंबोळा गावाच्या शिवारातील शेतात पुरून ठेवलेल्या रासायनिक खताच्या दोन हजार बॅग जप्त

 

टॅग्स :खतेशेतकरीशेतीशेती क्षेत्रखरीपअमरावतीविदर्भ