मागील हंगामातील उसाला ४०० रुपये व यंदाच्या हंगामात प्रतिटन ३,५०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह दक्षिण महाराष्ट्रात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे प्रमुख मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले एस. टी. स्टैंड चौकात कोल्हापूर-सांगली राज्य मार्ग ४० मिनिटे रोखून धरण्यात आला.
सातारा जिल्ह्यात पाचवड फाट्यावर महामार्गावर वाहतूक रोखली तर सांगलीत विजापूर गुहागर महामार्गावरच ठिय्या मारल्याने जवळपास एक तासाच्या वर मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता. गेल्यावर्षाच्या हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन ४०० रुपये आणि या हंगामातील उसाला साडेतीन हजार रुपये दर देण्याच्या मागणीसाठी रविवारी सकाळी ११ वाजता अंकली टोलनाक्यासह ऊस पट्टयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का जाम आंदोलन केले. यामुळे संबंधित मार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती.
अधिक वाचा: वीज, इथेनॉलवाल्यांपेक्षा साखरेत कमविणाऱ्यांकडून जादा दर
हातकणंगलेतील आंदोलनात 'स्वाभिमानी'चे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी सहभागी झाले होते. तिथे त्यांनी येत्या मंगळवारपर्यंत तोडगा काढा, अन्यथा २६ नोव्हेंबरला शिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग रोखू पुढील आंदोलन तीव्र आणि उग्र असेल. सन २०१२ साली झालेल्या आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, असा इशाराही दिला. दोन महिन्यांपासून संघटनेच्या नेतृत्वाखाली ऊस दरासाठी शेतकरी संघर्ष करत आहेत. यावर मार्ग निघत नसल्याने रविवारी चक्का जाम आंदोलन केले. अंकली टोल नाक्यावरील आंदोलनात दानोळी, कवठेसार, जैनापूर, कोथळी, उमळवाड, अर्जुनवाड, चिंचवाड उदगाव येथील शेतकरी सहभागी झाले होते. येथे 'स्वाभिमानी'चे नेते सावकर मादनाईक म्हणाले.
तातडीने ऊस दराचा प्रश्न निकाली काढावा, नाहीतर आंदोलन अधिक उग्र करू. चौंडेश्वरी फाटा येथे सागर शंभूशेटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. येथे नांदणी, धरणगुत्ती, जांभळी, हारोली, यड्राव, कोंडीग्रे, निमशिरगाव, तमदलगे या परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. शिये, कबनूर चौक, हातकणंगले चौक, वडगाव, नृसिंहवाडी, इचलकरंजी नदीवेस, हेरवाड, हुपरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले. आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली. या आंदोलनात महिलांचा सहभागी लक्षणीय होता.
..तर २६ ला राष्ट्रीय महामार्ग रोखणारऊस दराबाबत आणि मागील येणे रकमेबाबत मंगळवारपर्यंत (दि. २१) तोडगा निघाला नाही, तर २६ नोव्हेंबरला पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणगंले येथे सांगितले.