सोलापूर : पावसाने गुंगा गुंगारा मारल्याने उसाच्या वजनाला मोठा फटका बसण्याचा अंदाज असताना अवकाळी पावसाने गाळप हंगाम तर लांबलाच शिवाय टनेजमध्येही वाढ झाली होती.
या मागील वर्षीच्या गाळपासाठीच्या उसाचे ३६ हजार ७५३ कोटी रुपये राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळाले आहेत. उताऱ्यात आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना सर्वाधिक ४,९०७ कोटी तर गाळपात राज्यात प्रथम असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना ४,३४७ कोटी रुपये मिळाले आहेत.
मागील वर्षीच्या पावसाळ्यात जेमतेम व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. सहा महिन्याच्या कडक उन्हाळ्यानंतर चांगला पाऊस न पडल्याने उसाची वाढ म्हणावी तशी झाली नाही.
त्यामुळे साखर हंगामावर परिणाम होणार हा अंदाज साखर कारखान्यांना होता. मात्र डिसेंबर व त्यानंतर अवकाळी पाऊस चांगला पडला होता. त्यामुळे उसाच्या वजनात वाढ होण्यास मदत झाली. त्यामुळे अंदाज चुकवित साखर हंगाम लांबला होता.
राज्यात २०७ साखर कारखान्यांनी १,०७६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले होते. या उसापोटी शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून एफआरपी व जाहीर केल्याप्रमाणे एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.
साखर उतारा चांगला असलेल्या कोल्हापूर व इतर जिल्ह्यात एफआरपी प्रमाणे तर उतारा कमी असलेल्या इतर जिल्ह्यात जाहीर केल्याप्रमाणे कारखान्यांनी दर दिला आहे.
२०७ कारखान्यांकडून १,०७६ लाख मेट्रिक टन● मागील वर्षी २०७ साखर कारखान्यांनी १,०७६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले होते. कारखान्यांकडून ३६ हजार ७५३ कोटी शेतकऱ्यांना देय असून आतापर्यंत ३६ हजार ६६३ रुपये दिले तर ९० कोटी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत.● कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे गाळप २४२ लाख मेट्रिक टन झाले होते. या दोन जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना ७,०८१ कोटी, २३९ लाख मेट्रिक टन गाळप करणाऱ्या पुणे व सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना ६ हजार २२९ कोटी, २२१ लाख मेट्रिक टन गाळप झालेल्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात ४,९६० कोटी तर १४२ लाख मेट्रिक टन गाळप करणाऱ्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना ३,३३४ कोटी रुपये मिळाले आहेत.
सोलापूर अन् कोल्हापूर जिल्हामागील वर्षी राज्यात सोलापूर जिल्ह्याचे सर्वाधिक १६८ लाख ४७ हजार मेट्रिक टन गाळप व ९.४६ टक्के साखर उतारा तर कोल्हापूर जिल्ह्याचे १५३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप व १२.२० टक्के साखर उतारा पडला होता. साखर उताऱ्यानुसार एका टनाला कोल्हापूर जिल्ह्यात कमीत कमी २,९०० रुपये तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २,९०० रुपये दर ऊस उत्पादकांना मिळाला आहे.