राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता दोन हजार रुपये २६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. याचबरोबर केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ लाख ६० हजार ५४६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीआधीच चार हजार रुपये जमा होणार आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारनेही नमो शेतकरी सन्मान योजनेला मंजुरी दिल्यामुळे याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिला जाणार आहे. यामुळे वर्षाला शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे बारा हजार रुपये मिळणार आहे.
'नमो शेतकरी सन्मान'ला मंजुरी
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. या योजनेचा प्रथम हप्ता २६ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत कार्यक्रमात दिला जाणार आहे.
आता शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार मिळणार
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात.आता महाराष्ट्र सरकारतर्फे नमो शेतकरी महासन्मान निधींतर्गत प्रति वर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. या अंमलबजावणीला सुरुवात होत असल्याने आता शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळणार आहेत.
जिल्ह्यात ३ लाख ६० हजार लाभधारक
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पीएम किसान सन्मान निधीचे ३ लाख ६० हजार ५४६ लाभार्थी शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनाच आता राज्य सरकारच्या नमो महाकिसान सन्मान निधीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
चार महिन्यांपासून आधार सीडिंगचे आवाहन
नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि पीएम किसान सन्मान निधीचे दोन हजार असे एकूण ४ हजार रुपये दिवाळीपूर्वी शेतकयांच्या बँक स्वात्यात जमा होणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मागील चार महिन्यांपासून शेतकऱ्यांनी त्यांची बँक स्वाती आधार सीडिंग करून घेण्याचे निर्देश दिले होते.
शेतकऱ्यांचे आधार सीडिंग बाकी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ हजार ५६० शेतकऱ्यांचे आधार सीडिंग बाकी आहे. यामुळे त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येणार आहे.
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीबरोबरच राज्य सरकारकडून नमो किसान महासन्मान योजनेची अंमलबजावणी होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची बँक खाते आधार लिंक आणि आधार सीडिंग करणे गरजेचे आहे. आधार सीडिंग असल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात नमो किसान सन्मान निधीची रक्कम जमा होणार नाही. यामुळे ज्यांचे आधार सीडिंग बाकी आहेत त्यांनी तत्काळ बँकेत जाऊन आधार सीडिंगचे काम पूर्ण करावे.-प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक
२ हजार ३६९ शेतकऱ्यांचे आधार ई-केवायसी बाकी किसान सन्मान निधीसाठी पात्र जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी २ हजार ३६९ शेतकऱ्यांचे ई-केवायसी केलेले नसल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.