Join us

एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्जाची उचल केलेल्या पात्र शेतकऱ्यांना मिळाले 'प्रोत्साहन'चे ४० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 1:31 PM

Mahatma Phule Karj Mukti Yojana एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्जाची उचल केलेल्या पात्र १० हजार ७७९ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ४० कोटी १५ लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान शुक्रवारी जमा झाले.

कोल्हापूर : एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्जाची उचल केलेल्या पात्र १० हजार ७७९ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ४० कोटी १५ लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान शुक्रवारी जमा झाले. राज्य शासनाने निकषात बदल केल्याने हे खातेदार पात्र झाले होते.

राज्य शासनाने २०१९ मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. या योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते.

त्यानंतर पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णयही त्यावेळी घेण्यात आला. पीककर्जाची परतफेड केलेल्या २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० यांपैकी कोणत्याही दोन वर्षांत नियमित परतफेड केलेले शेतकरी पात्र ठरले.

या तीन वर्षांपैकी २०१९-२० मध्ये उचल केलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. गेली पाच वर्षे प्रोत्साहन अनुदानाचे घोंगडे भिजत आहे. सहा महिन्यांपूर्वी बहुतांश शेतकऱ्यांना पैसे मिळाले; पण, कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी आहेत.

ऊस उत्पादकांचा परतफेडीचा कालावधी आर्थिक वर्षात होत नाही. जूनपर्यंत परतफेड होत असल्याने एकाच आर्थिक वर्षात पीककर्जाची दोन वेळा उचल केलेली दिसते. या तांत्रिक मुद्द्यामुळे सुमारे ११ हजार ६६७ शेतकरी अपात्र ठरले होते.

याविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. यातील बहुतांश शेतकरी हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित आहेत. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्न करून या शेतकऱ्यांना पात्र ठरवले.

प्रोत्साहन अनुदानाच्या निकषात बदल करून सुधारित अध्यादेश काढल्यानंतर विकास संस्थांकडून शेतकऱ्यांची नावे मागवली.

त्यानुसार जिल्ह्यातून ११ हजार ६६७ खातेदार शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पाठवण्यात आली. निकषांनुसार त्यातील १० हजार ७७९ शेतकरी पात्र ठरले. मात्र, गेली दीड-पावणे दोन महिने त्यांचे पैसेच आले नव्हते.

अपात्र ३३ हजार शेतकऱ्यांचे काय?एकच वर्ष परतफेड केलेले, आयकर परतावा करणारे, कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेले ३३ हजार ६६७ शेतकऱ्यांना अपात्र ठरवले आहे. बँक व सहकार विभागाने योग्य प्रकारे माहिती न भरल्याने शेतकरी अपात्र ठरल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

दृष्टिक्षेपात प्रोत्साहन अनुदान योजनाअर्ज दाखल केलेले खातेदार - ३,००,८८५आतापर्यंत लाभ मिळालेले - १,८८,५६९एकूण रक्कम - ६८६ कोटी ५१ लाख

टॅग्स :पीक कर्जपीकशेतकरीशेतीसरकारराज्य सरकार