Join us

मकावरील अळी करिता कीटकनाशक फवारणी करताच ४५ एकरांतील मका रोपटे लागली जळायला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 2:45 PM

मका पिकावरील (Maize Crop Management) लष्करी अळिच्या नियंत्रणाकरिता फवारणीत वापर केलेल्या औषधीने सुमारे ५० टक्के मकाची रोपटे जळून गेली असून इतर पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

रऊफ शेख

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात नव्यानेच समावेश झालेल्या बिस्मिल्लावाडी गावातील ४३ शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी ४५ एकर क्षेत्रातील मका पिकावर कीटकनाशक फवारणी केली. या फवारणीत वापर केलेल्या औषधीने सुमारे ५० टक्के मकाची रोपटे जळून गेली असून इतर पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

बिलमिल्लावाडी येथील ३२ शेतकऱ्यांनी आपल्या ४५ एकर क्षेत्रात मकाची लागवड केली. लागवडीनंतर मका चांगली उगवून आली आहे. मात्र मकावर अळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने या सर्व शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी हर्बो पावर ऑर्गेनिक हे कीटकनाशक फवारणी केली. मात्र फवारणीच्या दोन दिवसानंतर या सर्व शेतकऱ्यांची मकाची रोपटे जळायला सुरुवात झाली.

एकाच दुकानातून खरेदी केली कीटकनाशके

बिलमिल्लावाडी येथील आरिफरखान, हारुण शब्बीर खान, इरफान मजीद खान, युसुफ सांडे खान, नवाब बिसमिल्ला खान, सरदार शब्बीर खान, हबीब खान, अयुब खान, मस्तान गुलाब खान आदींसह ४३ शेतकऱ्यांनी हर्बो पावर ऑर्गेनिक हे कीटकनाशक तळेगाव येथील कन्हैय्या कृषी सेवा केंद्रातून खरेदी केल्याचे सांगितले. या औषधाने सदरील शेतकऱ्यांचा घात केला आहे.

आठ दिवसांत सुमारे ५० टक्के

मकाची रोपटे जळून गेली असून इतर रोपटेही सुकत आहे. यामुळे शेतकरी हादरले असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी ज्या कृषी सेवा केंद्रातून हे कीटकनाशक खरेदी केले, त्याच्याविरोधात भोकरदन येथील येथील कृषी विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर कृषी सहायक विष्णू जाधव यांनी या पिकांची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. यासंदर्भात पंचनामे करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :पीक व्यवस्थापनशेतीशेतकरीफुलंब्रीमराठवाडामका