Join us

शेतकऱ्यांनो अतिरिक्त उत्पन्न कमवा; मधाच्या व्यवसायासाठी मिळणार ५०% अनुदान, अशी आहे योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 12:40 PM

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजनेतून मिळेल अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळणार असून अर्ज करण्याची मुदत ३० जुलै २४ पर्यंत आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशी पालन) राबविली जाते. यात मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

यातील वैयक्तिक मधपाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा. स्वतःची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, तर केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ योजनेसाठी लाभार्थी वैयक्तिक केंद्र चालक असावा. किमान १० वी उत्तीर्ण असावा, २१ वर्षांपेक्षा जास्त वय असावे.

अशा व्यक्तींच्या अथवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेती किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी, लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्र चालक संस्था योजनेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे किंवा १० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतलेली किमान एक एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे. एक हजार चौरस फूट इमारत असावी यासह इतर अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

३० जुलैपर्यंत करता येणार अर्ज

शेतकरी, कातकरी, सुशिक्षित बेरोजगार, पात्र संस्था, लाभार्थ्यांनी २० जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन हिंगोली जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा - ढगफूटी होऊनही शेतात साचले नाही पाणी; बीबीएफ पद्धत शेतकरी बांधवांसाठी ठरतेय वरदान

टॅग्स :शेती क्षेत्रहिंगोलीशेतकरीग्रामीण विकाससरकारी योजना