संदीप वानखडे
पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबविण्यात आली.
त्या योजनेंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ४ हजार ५८७ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा करण्यात आले असून, आतापर्यंत १९ कोटी ८४ लाख रुपये वितरित करण्यात आले आहे. अद्यापही ३६६ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असल्याने त्यांचे अनुदान रखडले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकीत कर्जदारांचे कर्ज माफ करण्यात आले होते. तसेच नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. मध्यंतरी या योजनेचा लाभ मिळण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८ हजार ९१४ शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी ५ हजार शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी ४ हजार ५८७ शेतकऱ्यांना १९ कोटी ८४ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
बँक खात्याचे लिंकिंग करण्याचे आवाहन
■ महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त्ती योजनेंतर्गत नियमित खातेदारांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जातो.
■ या लाभासाठी पात्र ठरलेल्या, परंतु आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपूर्वी ही प्रक्रिया करावी.
■ या कालावधीत व्हीके नंबर प्राप्त शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर जाऊन बँक खात्याचे आधार लिकिंग करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात ४ हजार ५८७ शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात आले आहे. या अनुदानापोटी १९ कोटी ८४ लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. उर्वरित ३६६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून या योजनेचा लाभ घ्यावा. यापूर्वीही शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याविषयी सुचना देण्यात आल्या आहेत. - नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, बुलढाणा.