Join us

राज्यात ५५ नद्या दूषित, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 12:00 PM

देशभरातील २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांतील ६०३ नद्यांपैकी ३११ नद्यांची काही क्षेत्र प्रदूषित

वायू प्रदूषणाने राज्याचा श्वास कोंडला असताना दुसरीकडे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा नद्यांच्या स्वच्छतेबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार राज्यातील ५५ नद्या प्रदूषित असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या मिठी नदीचाही यात समावेश असून, वायू प्रदूषणासह आता जल प्रदूषणाचा प्रश्नही बिकट होत आहे.

देशभरातील नद्यांतील प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ 'नॅशनल वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग प्रोगाम' राबवत असते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण किती आहे? यावर पाण्याचे प्रदूषण ठरवले जाते. यासाठी मंडळाकडून नद्यांतील पाण्याचे नमुने गोळा करत प्रयोगशाळेत त्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर नद्यांचा प्रदूषित पट्टा ठरवला जातो. देशभरातील २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांतील ६०३ नद्यांपैकी ३११ नद्यांची काही क्षेत्र प्रदूषित आढळल्याचे चोपणे यांनी सांगितले. देशात सर्वाधिक प्रदूषित म्हणजे ५५ नद्या राज्यात असून, त्या खालोखाल मध्य प्रदेश, बिहार, केरळ, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. २०१८ साली प्रसिद्ध केलेल्या अहवालात ३५१ नद्यांचे काही पट्टे प्रदूषित म्हणून जाहीर केले होते. ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी नद्यांच्या अहवालाचे विश्लेषण केले आहे.

कसे मोजतात प्रदूषण?

नद्यांतील पाण्यांचे नमुने गोळा केले जातात. त्यात फिजिओ केमिकल, बॅक्टेरिओलॉजिकल, मेटल्स आणि पेस्टीसाइड्सच्या मापदंडाच्या आधारे प्रदूषण ठरवले जाते. पाण्यातील प्राणवायूचे आवश्यक प्रमाण गृहित धरले जाते. त्यानुसार नद्यांची वर्गवारी केली जाते. सर्वाधिक प्रदूषित नद्यांना उपाययोजनेनुसार प्राधान्यक्रम दिला जातो.

कोणत्या नद्या प्रदूषित?

धोकादायक प्रदूषित : मिठी, मुठा, सावित्री, भीमा.

अत्याधिक प्रदूषित : गोदावरी, मुळा, पवना, कन्हान, मुळा-मुठा.

मध्यम प्रदूषित : तापी, गिरणा, कुंडलिका, दरणा, इंद्रावती, नीरा, घोड, कृष्णा, रंगावली, पातळगंगा, सूर्या, तितुर, वाघुर, वर्धा, वैनगंगा, चंद्रभागा, मोरना, मुचकुंदी.

सर्वसाधारण प्रदूषित : भातसा, पेढी, वाल, मोर, बुराई, कलू, कण, कोयना.

टॅग्स :नदीप्रदूषण