नाफेडच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याची घटना ताजी असतानाच आता नाफेडचा अधिकारी असल्याचे सांगून पिंपळगाव बसवंत येथील एका शेतकऱ्याला पाच लाख ऐंशी हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असून, याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायलो वाइनचे संचालक विश्वास माधवराव मोरे (रा. चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत) यांच्या मालकीची कांदा साठवणुकीची गुदामे आहेत. यापैकी १६ गोदामे संजय संपतराव शिंदे याने नाफेडचा अधिकारी असल्याचे सांगून भाडेतत्त्वावर घेतली होती. त्यासाठी आठ लाख ८० हजार रुपये भाडे ठरविण्यात आले. याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय शिंदे हा नाफेडमध्ये अधिकारी नसल्याची बाब यावेळी तपासामध्ये उघडकीस आली आहे. याबाबत घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे करीत आहेत.
१३ पैकी तीनच गाळ्यांचे दिले भाडे
शिंदे यांनी केवळ तीन लाख रुपये मोरे यांना दिले. तसेच भाड्याने घेतलेल्या १६ पैकी फक्त तीन गोदामांमध्ये कांदा साठवणूक केली व उर्वरित १३ गोदामांमध्ये कांदा साठा ठेवणार नाही, असे सांगितले. यामुळे विश्वास मोरे यांची तेरा गोदामे रिकामी राहिली. तसेच उर्वरित ठरलेली रक्कम देखील संशयित आरोपी संजय संपतराव शिंदे यांनी दिली नाही. त्यामुळे मोरे यांची पाच लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार विश्वास मोरे यांनी केली.
हेही वाचा : Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी