Join us

दिवाळीपर्यंत मिळणार हेक्टरी सहा ते २० हजार नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 10:32 AM

सर्वत्र पावसाने दडी मारल्याने सरासरीच्या ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यासाठी शासनाने नुकताच ट्रिगर-टू लागू करीत राज्यातील ४३ तालुके दुष्काळी ठरविले आहेत.

गजानन हगवणेबारामती तालुक्यासह सर्वत्र पावसाने दडी मारल्याने सरासरीच्या ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यासाठी शासनाने नुकताच ट्रिगर-टू लागू करीत राज्यातील ४३ तालुके दुष्काळी ठरविले आहेत. यामध्ये बारामती तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी सहा हजार ते वीस हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळू शकते.

चालू वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस तीनपेक्षा अधिक आठवड्यांचा खंड, पाणीपातळीत घट अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट, पिकांचे नुकसान, चाऱ्याचा प्रश्न गंभीर, पाणीटंचाई अशा सर्व बाबींचा विचार करून दुष्काळासंदर्भातील ट्रिगर-टू लागू करण्यात आला आहे. यामध्ये बारामती तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेले असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना बैंक खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम मिळू शकते, असा अंदाज कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा तालुक्यात सप्टेंबरच्या अखेरीस काही प्रमाणात हलकासा पाऊस झाला. मात्र, ऐन पावसाळ्याच्या दिवसांतही दोन ते अडीच महिने पावसाने दडी मारल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांची पिके करपून नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, यासाठी बारामती तालुक्यातील ११ महसूल मंडळाच्या विभागाकडून पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. पंचनामा केल्याच्या अहवालानुसार लवकरच शेतकऱ्यांना हेक्टरी २५ टक्के रक्कम नुकसानभरपाई दिली जाणार आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विमा कंपनीला देण्यात आले आहेत.

अशी मिळेल प्रतिहेक्टर नुकसानभरपाईबाजरी २४००० हजार, तूर ३५००० हजार, भुईमूग ४०,००० हजार, सोयाबीन ४९,००० हजार, कांदा ८०,००० हजार याप्रमाणे बाजरी, तूर, भुईमूग, सोयाबीन, कांदा या पिकांना प्रतिहेक्टरप्रमाणे नुकसानभरपाई मिळू शकते. यामध्ये बारामतीसह दौंड, इंदापूर, मुळशी पोंड, पुरंदर- सासवड, शिरूर-घोडनदी व वेल्हे, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला (सोलापूर), अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना व मंठा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज, शिराळा (सांगली), खंडाळा व वाई, हातकणगले व गडहिंग्लज, छत्रपती संभाजीनगर व सोयगाव, अंबाजोगाई, धारूर व वडवणी, रेणापूर, लोहारा, उल्हासनगर, शिंदखेडा, नंदुरबार, मालेगाव, सिन्नर, येवला, धाराशिव व वाशी, बुलढाणा व लोणार या तालुक्यांचा समावेश आहे.

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची विमा अर्जाची पडताळणी करून संबंधित शेतकऱ्यांना मोबाइलवरून कागदपत्रे अपूर्ण असल्याचे संदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकयांनी सातबारा, आठ-अ, सामूहिक क्षेत्र असल्यास संमतिपत्र, तसेच पीकपाहणी आदी कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यात सरासरी १५८९६ क्षेत्र असून ३०५१२ शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. - सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी, बारामती

टॅग्स :पीकपीक विमादुष्काळबारामतीशेतकरीशेतीपाऊसदिवाळी 2022