Join us

६.५६ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2023 9:36 AM

तत्कालीन युती सरकारने २०१७ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना १ लागू केली होती. पण राज्यातील तब्बल ६ लाख ५६ हजार शेतकरी अजूनही या योजनेपासून वंचित असून ५ हजार ९७५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीची त्यांना सात वर्षांनंतरही प्रतीक्षा करावी लागत आहे.

अशोक घाटेअडगाव बु. (जि. अकोला) : तत्कालीन युती सरकारने २०१७ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना १ लागू केली होती. पण राज्यातील तब्बल ६ लाख ५६ हजार शेतकरी अजूनही या योजनेपासून वंचित असून ५ हजार ९७५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीची त्यांना सात वर्षांनंतरही प्रतीक्षा करावी लागत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही योजना लागू झाली आणि तीत ४४ लाख ४ हजार शेतकऱ्यांना १८ हजार ७६२ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाला होता. २०१९ मध्ये सरकार बदलले आणि कर्जमाफीचे पोर्टलच बंद झाले. तेव्हापासून लाखो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

अशी होती योजनादीड लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ करणे, २५ हजार रुपये प्रोत्साहन, दीड लाखांवरील कर्जात सवलत अशा तीन प्रकारांचा त्यात समावेश होता. एकूण ५० लाख ६० हजार पात्र शेतकऱ्यांना २४ हजार ७३७ कोटी रुपयांची कर्जमाफी देणारी ही महत्त्वाकांक्षी योजना होती.

- गेल्या मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात ६ लाख ५६ हजार शेतकयांना अजूनही कर्जमाफी न मिळाल्याचा मुद्दा उचलला गेला आणि तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे जाहीरही केले.- कर्जमाफीसाठी नव्याने ५५ कोटी रुपयांची त्रोटक तरतूद करण्यात आली. ही रक्कम एकूण रकमेच्या एक टक्कादेखील नव्हती.

लाखो शेतकऱ्यांच्या अडलेल्या कर्जमाफीचा मागोवा मंत्रालयातून घेतला असता धक्कादायक माहिती मिळाली. या शेतकऱ्यांची यादीच महाआयटीकडून अद्याप सहकार विभागाला मिळालेली नाही. त्यामुळे स्वतः सहकार मंत्री दिलीप वळसे पाटीलदेखील हैराण झाले आहेत. वळसे पाटील यांनी बुधवारी मंत्रालयात या संदर्भात आढावा बैठक घेतली आणि घोडे नेमके कुठे अडले आहे याची विचारणा केली. त्यावर, महाआयटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या काही अडचणी सांगितल्या. २०१७ मध्ये ५० लाख ६० हजार शेतकरी पात्र ठरले होते. तेव्हा त्या शेतकऱ्यांची यादी होती. मात्र, नंतर संबंधित अधिकारी, कर्मचारी बदलले. तसेच तांत्रिक अडचणी आल्याने अद्ययावत याद्या तयार करण्यात अडचणी आल्याचे महाआयटीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती आहे.

२०१७ मध्ये दिवाळीच्या आदल्या दिवशी माझा व पत्नीचा साडीचोळी, ड्रेस तसेच कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन सरकारच्या वतीने सत्कार झाला होता. परंतु कर्जमाफीचा अजूनही लाभ दिला नाही. - अनिल मानकर, शेतकरी

अडगाव बु. मधील २४८ पात्र शेतकरी अजूनही योजनेच्या लाभाची वाट बघताहेत. धनत्रयोदशीच्या दिवशीच २०१७ मध्ये ही योजना आली. आमच्या गावातील शेतकऱ्यांना तिचा लाभ मिळावा म्हणून ते उद्या धनत्रयोदशीलाच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतील. - मनोहरलाल फाफट, अध्यक्ष, सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी 

टॅग्स :शेतकरीराज्य सरकारसरकारदेवेंद्र फडणवीस