कोल्हापूर : राज्य सरकारने राज्यातील अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज मिळवून देण्यासाठी आणखी चार साखर कारखान्यांना ६९२ कोटी रुपयांची हमी दिली आहे.
कुंभी कासारी, सदाशिवराव मंडलीक, शरद व राजाराम या साखर कारखान्यांना हे पैसे मिळणार आहेत. यापूर्वी राज्य सरकारने ११ कारखान्यांना १८०० कोटी रुपयांची हमी दिली आहे.
अडचणीतील साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज मिळवून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अशा ११ साखर कारखान्यांना मागील आठवड्यात १८०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले होते.
आता शिवसेना व भाजपशी संलग्न असलेल्या चार कारखान्यांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शिंदेसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील सदाशिवराव मंडलिक हमीदवाडा, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील 'कुंभी- कासारी, कुडित्रे कारखान्यांना हमी दिली आहे.
तसेच आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील 'शरद-नरंदे' यासह भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या छत्रपती राजाराम साखर कारखाना, कसबा बावडा या कारखान्यांना ६९२ कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे.
असे मिळणार अर्थसहाय्य• सदाशिवराव मंडलीक, हमीदवाडा : १५० कोटी• शरद साखर कारखाना, नरंदे : २०२ कोटी• कुंभी कासारी, कुडित्रे : १६४ कोटी• छत्रपती राजाराम, कसबा बावडा : १७६ कोटी