आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषीसाठी ७०९ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी ४६ हजार ४५३ कोटी ९० लाख रुपये खर्च करणार असल्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
याशिवाय मराठवाड्यातील ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली असून मराठवाड्यातील दुष्काळी आत्महत्याग्रस्त भागातील सिंचनाच्या प्रस्तावित धरण स्थळी मातीच्या धरणांच्या ऐवजी साखळी सिमेंट बंधारे बांधण्यासाठी निर्णय घेण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांची क्षमता असणारे नवीन शासकीय महाविद्यालय तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत बीड जिल्ह्यातील परळी येथे सोयाबीन संशोधन व प्रक्रिया याचे उपकेंद्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शासकीय कृषी महाविद्यालय व शासकीय कृषी व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, ठाणा येथे शासन अनुदानित कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. राज्यात पावसाने ओढ दिली आहे. काही ठिकाणी तो होत असला तरीसुद्धा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.