दिनेश पठाडे
राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी राज्य शासनाने २ ऑगस्ट रोजी निधी मंजूर केला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत अवेळी पावसाने नुकसान झालेल्या ७३ हजार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी १०३ कोटी ३४ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
बाधित शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मर्यादत रक्कम डीबीटीद्वारे बैंक खात्यात वर्ग केली जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल २०२४ मध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस होऊन गहू, हरभरा, मका, भाजीपालावर्गीय पिके, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते. महसूल विभागाने संयुक्त पंचनामे करून अहवाल तयार करून विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता.
फेब्रुवारी व मार्च-एप्रिल महिन्यातील नुकसानीचा अहवाल अनुक्रमे १५ एप्रिल आणि १५ मे रोजी शासनाकडे पाठविण्यात आला होता. बाधित शेतकऱ्यांना अनुदान केव्हा मंजूर होते, याकडे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.
अखेर तीन ते चार महिन्यांनंतर निधी मंजूर झाला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाईपोटी अनुदान थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला होता.
जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६००
जिरायत पिकांचे नुकसान झालेले असल्यास बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये नुकसानभरपाई मिळेल. ही मदत ३ हेक्टरच्या मर्यादेत असेल. प्रत्यक्षात किती टक्के नुकसान झाले त्यानुसार अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
बागायत पिकांना हेक्टरी २७ हजार
एसडीआरएफच्या प्रचलित दरामध्ये वाढ करण्यास राज्य शासनाने १ जानेवारी २०२४ पासून मान्यता दिली आहे. त्यामुळे बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी २७ हजार रुपये दिली जातील.
बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार
बहुवार्षिक पिकांसाठी यापूर्वी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई दिली जात होती. आता त्यात वाढ झाल्याने बाधितांना हेक्टरी ३६ हजार रुपयांची मदत मिळेल. मात्र, प्रत्यक्ष नुकसानावरच अनुदानाची रक्कम ठरते.
...तर त्या शेतकऱ्यांना अनुदान नाही
■ शेतकऱ्यांना एका हंगामातील पिकासाठी एकवेळच नुकसानभरपाई मिळणार आहे.
■ त्यामुळे गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा, गहू वा इतर पिकांची नुकसानभरपाई म्हणून अनुदान घेतले असेल किंवा अनुदान मंजूर झाले असेल, तर अशा शेतकऱ्यांना फेब्रुवारी ते मे महिन्यात झालेल्या नुकसानाचे अनुदान मिळणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
■ जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने हाती आलेले पीक शेतकऱ्यांना गमवावे लागले. पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात प्रचंड घट निर्माण झाली होती.
कोणत्या महिन्यात किती नुकसानभरपाई
फेब्रुवारी | मार्च ते एप्रिल | |
---|---|---|
३३,८४४ हेक्टर | नुकसानग्रस्त क्षेत्र | ९,०४९ हेक्टर |
५७,२४० | बाधित शेतकरी | १६,५२५ |
७८.१३ कोटी | निधी | २५.५१ कोटी |
हेही वाचा - शेतकऱ्यांनो, खरेदीदार नव्हे बीज विक्रेते व्हा; मालामाल बना!