farmers will get free electricity : राज्यातील शेतकऱ्यांच्या ७.५ हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज (electricity) देण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला असून, हिंगोली जिल्ह्यातील ७६ हजार ५६६ शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.राज्य शासनाने 'मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना' जाहीर केली आहे. २५ जुलै रोजी यासंदर्भातील शासन आदेशही काढला असून, या योजनेंतर्गत शेतीच्या सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी पंपांना मोफत वीज दिली जाणार आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत ही योजना लागू राहणार आहे. त्यामुळे शेतीच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना आता मोफत वीज उपलब्ध होणार आहे. या निर्णयानुसार ७.५ हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ७.५ अश्वशक्तीपर्यंत वीज पंप वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या ७६ हजार ५६६ एवढी आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या मोफत वीज योजनेचा फायदा घेता येणार आहे. मोफत वीज उपलब्ध होणार असल्याने त्याचा सिंचनासाठी फायदा होणार असून, उत्पन्न वाढीसाठीही ही योजना हातभार लावणारी ठरणार आहे.तिमाही वीज बिल कोटींच्या घरात २०२३-२४ मध्ये महावितरणने दिलेल्या तिमाही वीज देयकांची रक्कम कोट्यवधी रुपयांची आहे. त्यात औंढा नागनाथ २४.७४ कोटी, वसमत ४८.१६ कोटी, हिंगोली २७.७६ कोटी, कळमनुरी ३६.५८ कोटी आणि सेनगाव तालुक्यात ३४.०८ कोटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती महावितरणने दिली.
महावितरणला सूचना नाहीशासनाने ७.५ हॉर्स पॉवरपर्यंत कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासंदर्भात महावितरणला अद्याप कोणतीही सूचना देण्यात आली नाही. जून २०२४ चे (तिमाही) अद्याप बिलिंग झाले नाही. शासनाने एप्रिल २०२४ पासून मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या तिमाहीच्या बिलांबाबत वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.