नवी दिल्ली : उसाच्या उत्पादनातील घसरण, उताऱ्यातील घसरण, साखर निर्यातीस परवानगी आणि इसाचा इथेनॉलसाठी वाढलेला वापर यामुळे साखरेच्या किमतींत वाढ होऊ लागली आहे.
मागील महिनाभरात साखरेच्या किमती सुमारे २ टक्के वाढल्या आहेत. पुढेही भाव कमी होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्राप्त माहितीनुसार, यंदा उसाची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. त्यामुळे फेब्रुवारीत ७७ साखर कारखाने बंद पडले. साखर उत्पादनात आतापर्यंत अंदाजे ५० लाख टनाची कपात झाली आहे.
ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने हा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडने (एनएफसीएसएफ) डिसेंबरमध्येच ऊस टंचाईची भीती व्यक्त केली होती.
प्रतिकूल हवामान आणि कमी अनियमित पावसामुळे उसाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. पुरेशा उसाच्या अभावी महाराष्ट्रातील ३०, तर कर्नाटकातील ३४ साखर कारखाने १५ फेब्रुवारीच्या आधीच बंद पडले आहेत, अशी सध्याची स्थिती आहे.
तामिळनाडूतील ४ कारखानेही बंद पडले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड आणि गुजरात येथील साखर कारखानेही बंद पडत आहेत. सामान्य स्थितीत साखर कारखाने मार्च एप्रिलपर्यंत चालतात.
साखर उत्पादन घटणार
- उसाच्या टंचाईमुळे यंदा साखर उत्पादन १२ ते १४ टक्के घटण्याची शक्यता आहे.
- गेल्यावर्षी ३१९ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
- यंदा ते २७० लाख टनांवरच थांबेल असे दिसतेय.
- यंदा उसाची गुणवत्ताही घसरली आहे. त्यामुळे साखर उतारा कमी झाला आहे.
- गेल्यावर्षी फेब्रुवारीपर्यंत सरासरी ९.८७ टक्के साखर उतारा होता. तो यंदा घसरून ९.०९ टक्क्यांवर आला आहे.
अधिक वाचा: Jamin Mojani : एक हेक्टर जमिनीची मोजणी आता होणार फक्त एका तासात; आलंय हे नवं तंत्रज्ञान