Join us

शेतकरी बांधव घरचे सोयाबीन बियाणे वापरत असल्याने वाचतो ७८ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:21 PM

घरचेच बियाणे वापरणार; त्यांचा खर्च वाचणार!

सुधीर चेके-पाटील

बुलढाणा : खरीप हंगामात तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन पिकाला गतवर्षी भाव मिळालेला नाही. तरीही यंदा शेतकऱ्यांची पहिली पसंती ही सोयाबीन पिकालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेरणीसाठी आवश्यक बियाण्यांचा आढावा घेतला असता.

यावर्षी सुमारे ७० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज भासणार आहे. मात्र, गत काही वर्षांचा अनुभव पाहता तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांचा घरचे बियाणे वारण्याकडे कल असल्याने या माध्यमातून यंदाही सुमारे ७८ कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे.

मान्सूनपूर्व होणारा वादळी पाऊस व वातावरणातील बदल पाहता शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून, पेरणीची पूर्व तयारी केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील खरिपातील प्रमुख पीक सोयाबीनने दराच्या बाबतीत सलग दोन वर्षे शेतकऱ्यांची निराशा झाली असली.

तरीही यंदा सोयाबीन हेच खरिपातील मुख्य पीक राहणार आहे. संभाव्य पीकपेरा पाहता यंदा ८८ हजार ८७४ एकूण लागवडक्षेत्रापैकी तब्बल ७३ हजार २०५ हेक्टरावर यंदा सोयाबीनचा पेरा राहणार आहे.

यासाठी सुमारे ७० हजार क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. तर घरचे बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांची टक्केवारी ८० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार असली तरी ८० टक्क्यांचा आकडा गृहीत धरल्यास बियाण्यांवर होणारा तब्बल ७८ कोटींचा खर्च वाचणार, हे निश्चत.

गरजेपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध

संभाव्य ७३ हजार हेक्टरवरील सोयाबीनसाठी ७० हजार क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. हे बियाणे विकत घ्यायचे झाल्यास जवळपास ९८ कोटी रुपये खर्च होतो. इतके रुपये खर्चुनही सोयाबीनला भाव मिळत नसल्याने गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरण्यावर भर दिला. शेतकऱ्यांनी एक लाख तीन हजार ४१९ क्विंटल बियाणे राखून ठेवले आहे. राखून ठेवलेले हे बियाणे गरजेपेक्षा अधिक आहे.

८८,८७४ एकूण लागवड क्षेत्र

७०,००० क्विंटल बियाण्यांची गरज

७८ कोटी रूपयांचा खर्च वाचणार

७३२०५ हेक्टवर सोयाबीनचा पेरा

असा वाचला खर्च

एक हेक्टर सोयाबीन लागवडीसाठी बाजारातून घेतलेल्या बियाण्यांवर सुमारे १२ हजार प्रतिहेक्टर खर्च होतो. यानुसार ७० हजार क्विंटल बियाण्यांवर सुमारे ९८ कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. यापैकी ८० टक्के शेतकऱ्यांकडून जवळपास ५६ हजार क्विंटल घरचे बियाणे वापरल्यास या माध्यमातून ७८ कोटी रुपयांची बचत होईल.

घरचे बियाणे वापरल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात २५ टक्क्यांची बचत होते. यासोबतच बऱ्याचदा बनावट बियाणे देऊन त्यातून फसवणूक होते. घरच्या बियाण्यांमुळे ही फसवणूकही टळते.

हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट

टॅग्स :सोयाबीनशेतीपीक व्यवस्थापनखरीपशेतकरी