डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार आहे.
असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्वी, वर्धा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले.
तसेच वर्धा जिल्ह्यात लोअर वर्धा प्रकल्प, वाढोणा-पिंपळखुटा आदी सिंचन प्रकल्पांद्वारे शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करून देऊ आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावरील नोडवर एमआयडीसी उभारुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह ७२० कोटींच्या विकास कामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
गृह (ग्रामीण) राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार सर्वश्री दादाराव केचे, सुमीत वानखेडे, समीर कुणावर, राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली आहे. शेतीसाठी १२ तास विजेची शेतकऱ्यांची मागणी होती.
यादृष्टीने राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरु केली असून डिसेंबर २०२६ पर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांना ३६५ दिवस दिवसाला १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
राज्य शासनाने २०२५ ते २०३० पर्यंत राज्यातील वीज वापरकर्त्यांचे वीज बील दरवर्षी कमी करण्याचे नियोजन व तशी कार्यवाही सुरु केली आहे. तसेच ३०० युनीट पर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन
- वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे वर्ध्यासह विदर्भातील दहा जिल्ह्यामधील काही दुष्काळग्रस्त भाग सुजलाम सुफलाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- या प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द धरणातील ६२ टीएमसी सांडव्याद्वारे नव्याने ५५० कि.मी.ची नदी तयार करण्यात येणार आहे. यासाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- या योजनेसाठीच्या सर्व मंजुरी देण्यात आल्या असून योजनेचा अंतिम आराखडा तयार होत आहे. यावर्षा अखेरी किंवा पुढील वर्षाच्या सुरवातीला या योजनेचे काम सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा: उन्हाळ्यात साप दिसण्याचे प्रमाण का वाढते? जाणून घ्या सविस्तर?