पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, औरंगाबाद विभागातील ८५ % शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून १५% शेतकऱ्यांचे ई- केवायसी करणे अजूनही बाकी आहे. पीएम किसान योजनेचा निधी खात्यावर येण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य असून ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केली नसेल त्यांनी ती तात्काळ करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
PM किसानचा १४ व हप्ता कधी येणार? ही चर्चा आता थांबली आहे. 27 जुलै पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या 14 व्या हप्त्याचे वाटप होणार आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये दर चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, फुलंब्री, सोयगाव, औरंगाबाद, विपुर, पैठण या तालुक्यांमधील एकूण ३ लाख ८४ हजार २०३ शेतकऱ्यांपैकी ३ लाख २७ हजार १६९ शेतकऱ्यांचे ई- केवायसी पूर्ण झाले असून PM- किसानच्या १४ व्या हप्त्यासाठी ते पात्र आहेत. अजूनही एकूण ५७ हजार ३४ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसल्याने त्यांना PM- किसानचे पैसे खात्यावर जमा होणार नाहीत. यासोबतच जर एखाद्याच्या आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल तर त्याचा १४ वा हप्ताही थांबवला जाऊ शकतो.
कसे कराल ई- केवायसी ?
१) ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर pmkisan.gov.in वर जावे लागेल.
२) या वेबसाइटवर ई -केवायसी पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
३) ई -केवायसी च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
४) यानंतर PM किसान सन्मान निधीशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
५) या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे केवायसी काम पूर्ण होईल.