अनुसूचित जमातीच्या समूहातील लोकांचे जीवनमान उंचवावे, त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, या हेतूने आदिवासी विकास विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून केली जाते. आदिवासी विकास प्रकल्पाच्या न्यूक्लिअर बजेट अंतर्गत विविध वैयक्त्तिक योजनांमध्ये ८५ टक्के अनुदान देण्यात येते. अर्ज करण्याची मुदत संपली असून लाभासाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. प्राप्त अर्जाची छाननी करून निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत योजना
आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये काटेरी तार लोखंडी अँगलसह खरेदी करणे, खाद्य स्टॉल, पीठ गिरणी, शिलाई मशिन, पिको फॉल मशिन व इतर योजना राबविल्या जातात.
निवड प्रक्रिया सुरु
अकोला येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज मागविले होते. या मुदतीत प्राप्त अर्जाची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. निकषानुसार अर्ज, कागदपत्रांची तपासणी आदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच लाभार्थ्यांची अंतिम निवड होणार आहे.
चार योजनांसाठी तीन जिल्ह्यातून २८९७ अर्ज
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांच्याकडून आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना काटेरी तार, युवकांना खाद्य स्टॉल, युवतींना शिलाई मशिन व पिको फॉल मशिन, युवतींना पीठगिरणी खरेदीसाठी ८५ टक्के अनुदानावरील योजनांच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात आले होते. अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातून मिळून एकूण चार योजनांसाठी २ हजार ८९७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील आदिवासी घटकांतील पात्र लाभार्थीकडून अर्ज मागविण्यात आले होते. तीन जिल्हे मिळून चार योजनांसाठी ३२० लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट असून २८९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. निकषानुसार लाभार्थीची निवड प्रक्रिया केली जाणार आहे. -मोहन व्यवहारे, प्रकल्प अधिकारी, अकोला