पावसाळा तोंडावर आला आहे. पेरणीयोग्य पाऊस होताच शेतकरी चाड्यावर मूठ धरतात. अशावेळी शेतकऱ्यांच्या माथी दर्जाहीन बियाणे, खते मारले जाऊन फसवणूक होवू नये, यासाठी धाराशिव जिल्हा परिषद कृषी विभागाकडून दुकानांमध्ये जावून नमुने संकलित करण्यात येत आहेत.
एप्रिल व मे महिन्यात जवळपास १२२ नमुने घेतले होते. ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता, बियाणाचे (Seeds) सर्व ८८ नमुने 'पास' झाले. मात्र, खताच्या ३४ पैकी ६ नमुन्यांचा अहवाल 'फेल' आला आहे. आता संबंधित खत उत्पादक कंपन्यांना नोटिसा धाडण्यात येताहेत.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरीखरीप (Kharif) हंगामाच्या पेरणीसाठी सरासरी ७७ हजार ८७५ मेट्रिक टन खताचा (Fertilizer) वापर करतात. हा सरासरी वापर विचारातून घेऊन जिल्हा परिषद कृषी विभागाने ९८ हजार ३०० मेट्रिक टन खत मागणी केले होते.
मात्र, आयुक्तालयाकडून ८५ हजार ८०० मे. टन आवंटन मंजूर करण्यात आले. बियाणाच्या बाबतीतही असेच काहीसे चित्र आहे. पावसाळा Rain तोंडावर आला आहे. कोणत्याही क्षणी पेरणीयोग्य पाऊस झाल्यास शेतकरी चाड्यावर मूठ धरतील. हीच बाब लक्षात घेऊन बियाणे, खत उत्पादक कंपन्यांनीही पुरवठ्याची गती वाढविली आहे.
दरम्यान, कंपन्यांकडून पुरविण्यात आलेले खत आणि बियाणे खरोखर दर्जेदार आहे का? हे पाहण्यासाठी 'कृषी'च्या पथकाकडून युद्धपातळीवर नमुने घेण्यात येत आहेत. मे आणि एप्रिल अशा दोन महिन्यांत खत आणि बियाणाचे मिळून १२२ नमुने घेण्यात आले. यामध्ये बियाणाचे ८८ तर खताच्या ३४ नमुन्यांचा समावेश आहे.
बियाणाचे नमुने परभणी तर खताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. नुकताच या नमुन्यांचा अहवाल आला आहे. तपासणीत सर्व ८८ नमुने 'पास' झाले आहेत. मात्र, खताच्या ३४ पैकी ६ नमुन्यांचा अहवाल 'फेल' आला आहे. आता संबंधित खत उत्पादक कंपन्यांना आता 'कृषी'कडून (Agriculture sector) नोटिसा बजावण्यात येताहेत. खुलासा असामाधानकारक आढळून आल्यास त्यांच्याविरूद्ध पोलिस (Police) कारवाई करण्यात येणार आहे.
'त्या'चा एकही नमुना नाही
पेरणी होते ना होते तोच कोवळ्या पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव सुरू होतो. कीटरोड आटोक्यात आणण्यासाठी कीटकनाशकांची (Pesticides) फवारणी केली जाते. दर्जाहीन कीटकनाशके पुरवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी कीटकनाशकांचेही नमुने घेतले जातात. हे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासले जातात. मात्र, मागील दोन महिन्यात 'कृषी'च्या पथकाकडून एकही नमुना घेण्यात आलेला नाही, हे विशेष.
निविष्ठा | नमुने घेतले | अहवाल प्राप्त | फेल |
बियाणे | ८८ | ८८ | ० |
खत | ३४ | ३४ | ०६ |
कीटकनाशक | ०० | ०० | ०० |
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खत मिळावे, त्यांची फसवणूक होणार नाही या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. खत, बियाणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येताहेत. एखाद्या नमुन्याचा अहवाल फेल येताच कायदेशीर कार्यवाही सुरू केली जात आहे. खताचे सहा नमुने फेल आले आहेत. संबंधित कंपन्यांना नोटिसा देण्यात येताहेत. - प्रमोद राठोड, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव.
हेही वाचा - Aloeveras Health benefits & Products गुणकारी कोरफडीचे आरोग्यदायी फायदे व उत्पादने