पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. तर ज्या भागात उसाची उपलब्धता आहे अशा भागातील साखर कारखाने अजूनही सुरू आहेत. राज्यातील साखरेचे उत्पादन यंदाच्या हंगामात वाढले असून देशातील साखर उत्पादन काहीसे कमी झाल्याचे चित्र आहे. कर्नाटकमध्ये उसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे देशांतर्गत साखरेच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
दरम्यान, साखर आयुक्तालयाकडून १७ एप्रिलअखेर राज्याचा उस गाळप अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यातील २०७ साखर कारखान्यांपैकी १९६ साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. तर केवळ ११ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. मागच्या हंगामात यावेळी सर्व कारखान्यांनी गाळप थांबवले होते. परिणामी यावर्षी गाळप हंगाम जास्त दिवस चालला आहे.
किती झाले साखर उत्पादन?याचवेळी मागच्या हंगामात १ हजार ५३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते आणि १ हजार ५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. तर सध्या राज्यात १ हजार ६६.८२ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून त्यातून १ हजार ९३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदा साखर आणि उसाचे उत्पादनही वाढल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर यंदाच्या गाळप हंगामातील साखर उतारा हा मागच्या वर्षीपेक्षा जास्त असून १०.२५ एवढा आहे. तर मागच्या हंगामात हा उतारा १०.०० एवढाच होता.
कोल्हापूर विभागात सर्वाधिक साखर उत्पादनराज्यातील साखर उत्पादन यंदा वाढले असून कोल्हापूर विभागात २७९ लाख क्विंटल, पुणे विभागात २४८.३७ लाख क्विंटल, सोलापूर विभागात २०४.८७ लाख क्विंटल, अहमदनगर विभागात १४० लाख क्विंटल, नांदेड विभागात १२० लाख क्विंटल, छत्रपती संभाजीनगर विभागात ८८ लाख क्विंटल, अमरावती विभागात ९.३९ लाख क्विंटल आणि नागपूर विभागात ६.५९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
कधी संपेल गाळप हंगाम?सध्या राज्यातील केवळ ११ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. राज्यातील काही भागांत दुष्काळ जाहीर झाला असला तरी अन्य भागांत पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस संपल्यानंतर उर्वरित ११ साखर कारखाने आपले गाळप थांबवतील. तर येणाऱ्या १० ते १२ दिवसांत राज्यातील गाळप हंगाम संपण्याची चिन्हे आहेत.