Join us

राज्यातील ९८% साखर कारखान्यांचे गाळप थांबले! केवळ ६ साखर कारखाने सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 7:02 PM

पुढील चार ते पाच दिवसात हंगाम संपण्याची चिन्हे आहेत. 

पुणे : सध्या राज्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून राज्यातील जवळपास ९८% साखर कारखाने बंद झाले आहेत. ज्या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उसाची उपलब्धता आहे असे साखर कारखाने सध्या सुरू असून पुढील चार ते पाच दिवसात हंगाम संपण्याची चिन्हे आहेत. 

यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे उसाचा हंगाम कमी दिवस चालेल अशी शक्यता होती परंतु, नोव्हेंबर अखेर आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे उसाचे उत्पादन वाढले आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील साखर उत्पादनामध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील ९८% साखर कारखाने बंद यंदा राज्यात २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले होते. त्यापैकी १०३ साखर कारखाने सहकारी तर १०४ साखर कारखाने हे खाजगी स्वरूपातील होते. साखर आयुक्तालयाच्या २३ एप्रिलच्या गाळप अहवालानुसार राज्यातील दोनशे साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. तर ५ साखर कारखाने सुरू असून २ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्यामुळे त्यांच्यावर साखर आयुक्तालयाकडून आरआरसी कारवाई करण्यात आली आहे.

कोणते साखर कारखाने सुरू?१) सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वरनगर, बारामती२) विघ्नहर सहकारी साखर कारखाना शिरोली, ता. जुन्नर३) श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कुमठे, ता. उत्तर सोलापूर४) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, ता. श्रीरामपूर५) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अमृतनगर, ता. संगमनेर६) मानस ऍग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड युनिट -४  देव्हाडा, मोहाडी, ता. भंडारा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीऊस