Join us

शेतजमिनीच्या सुपीकतेसाठी हवा जैविक खतांचा 'बूस्टर डोस'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 9:28 AM

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बिघडला पोत : उत्पादनात होतेय घट

अलीकडे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. यामुळे उत्पादनात घट होत असून शेतजमिनीतून कोणतेही पीक उत्तम प्रकारे घ्यायचे असेल, तर सुपीकता आवश्यक आहे. ही सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जैविक खतांचा बूस्टर डोस महत्त्वाचा असल्याची माहिती कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. सुपीकतेसाठी महत्त्वाचे असलेले नैसर्गिक अन्नघटक पिकास नैसर्गिकरीत्या मिळतात.

शेतजमिनीच्या एक ग्रॅम मातीत दोन कोटी ४० लाखांपेक्षा जास्त जीवाणू व ते १३० प्रकारचे असतात. ज्या जमिनीचा सामू ६.५, तसेच सेंद्रिय कर्बाची पातळी ०.८ च्या पुढे आहे, अशी शेती सुपीक मानली जाते. मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावी लागतात. पिकास अन्नघटक जसेच्या तसे जमिनीत देण्याचे काम जीवाणू करतात. या जीवणूंची संख्या व कार्यक्षमताही अत्यंत महत्त्वाची असते.

नत्र स्थिर करणाऱ्या सहजीवी जैविक गटात रायझोबियमचा समावेश होतो, तर असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणाऱ्या गटात अझेटोबॅक्टर, अझोस्पीरीलम, असिटोबॅक्टर यांचा समावेश होतो, याशिवाय अन्य प्रकारची खतेही असतात. 

मुख्य अन्नद्रव्ये

मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश आदींचा समावेश होतो. ही अन्नद्रव्ये जास्त पुरवावी लागतात.

कोणती आहेत जैविक खते?

■ बुलढाणा जिल्ह्यात पिकांची पातळी वाढविण्यासाठी जैविक कर्ब द्यावा लागतो, जैविक कर्ब हा सेंद्रिय खतातून मिळतो. जीवामृत, वेस्ट डी कंपोझर, हामिक, अॅझो, रायओ, पीएसबी केएसबी अर्शी जैविक खते व हिरवळीची खते कमी खर्चात पिकाला देता येतात.

■ जैविक खते किवा जीवाणूमुळेच शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळू शकते. जमिनीत जिवाणू नसतील, तर कितीही रासायनिक खते दिली, तरी उत्पन्न कमी मिळते.

सूक्ष्म अन्नद्रव्ये

सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये फेरस-लोह, झिंक जस्त, कॉपर-तांबे, मॅगनीज, मोलाब्द (मॉलेब्डेनम), बोरॉन, निकेल आदींचा समावेश आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांच्या मानाने कमी किंवा अतिसूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात.

नैसर्गिक अन्नघटक

नैसर्गिक अन्नघटकात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन (प्राणवायू) आदींचा समावेश आहे. हे घटक नैसर्गिकरीत्या हवा, पाणी, सूर्यप्रकाश यांपासून मिळतात.

दुय्यम अन्नद्रव्ये

दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आदींचा समावेश होतो. ही अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्यांच्या मानाने कमी प्रमाणात पुरवावी लागतात.

हेही वाचा - Organic Fertilizer गाजर गवतापासून या सोप्या पद्धतीने तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत

टॅग्स :सेंद्रिय शेतीखतेसेंद्रिय खतशेतीशेतकरीशेती क्षेत्र