Join us

पावसाचा तडाखा; ५८ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसान पंचनाम्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 1:17 PM

पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे बीड जिल्ह्यात पंचनामे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात रविवारी व सोमवारी या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पाच तालुक्यांतील ५८ हजार २९३ हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे,  तर १७८ गावे बाधित झाली असल्याचे प्राथमिक अहवालाद्वारे समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार पंचनाम्यास सुरुवात झाली आहे.

बीड जिल्ह्यात रविवारी पहाटे सुरूझालेला पाऊस सोमवारी पहाटेच्या सुमारास थांबला. या पावसामुळे अनेक भागांतील नद्या-नाल्यांना पाणी आले होते. तर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सततच्या पावसामुळे बहरात आलेले सोयाबीन, कापूस, कांदा यासह इतर पिकांचे नुकसान झाले. 

रविवारी व सोमवारी या दोन दिवसांत झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणच्या घरांची अशंतः पडझड झाली. संततधार असल्याने मातीच्या भिंती व जुनी घरे अंशतः पडझड झाल्याचे समोर आले होते. दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागासह कृषी विभागास पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

महसूल व कृषी विभागाने प्राथमिक माहिती घेतली असता परळी, आष्टी, पाटोदा, माजलगाव व बीड तालुक्यांतील ५८ हजार २९३ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे, तर १७८ गावे बाधित झाली आहे. सदरील माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता तालुकास्तरवर महसूल, कृषी यांच्याकडून संयुक्तरीत्या पंचनामे सादर करण्यात येतील. त्यानंतर किती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, हे समोर येईल.

४८ हजारांवर शेतकरी बाधित

बीड, माजलगाव, परळी, आष्टी व पाटोदा या पाच तालुक्यांतील ४८ हजार ६७७ शेतकऱ्यांचे ५८ हजार २९३ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे माजलगाव तालुक्यात झाले आहे.

बागायत, फळपिकांचे नुकसान नाही

बीड जिल्ह्यात रविवारी व सोमवारी या दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे कोरडवाहू शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, कोणत्याही ठिकाणच्या बागायत किंवा फळपिकांचे नुकसान झाले नाही. ही एकप्रकारे समाधानकारक बाब म्हणावी लागेल.

संततधार असल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतांमध्ये आजही पाणी साचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिकांचे वेगाने पंचनामे होणे आवश्यक असल्याचे मत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

कोरडवाहू पिकांचे नुकसान

तालुका शेतकरी संख्याबाधीत क्षेत्र (हेक्टरमध्ये)
बीड१०४.८  
माजलगाव३०४४२४५७४३
 परळी२०५५५
आष्टी    ८४७५३६७०
पाटोदा९५४५८८२०
एकूण       ४८६७७ ५८२९३
टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसबीडपीक