Join us

ग्रामीण संस्कृतीत शेणाच्या गोवऱ्या आणि शेतकऱ्याचं जीवन कशी होती यांची सांगड वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 2:25 PM

पूर्वी खेड्यात घराच्या पहिल्याच दालनात जनावरांचा मोठा गोठा असायचा. घरात प्रवेश करताच पहिले दर्शन जनावरांचे होत असे. ज्या घरात जनावरे मुबलक असायची ते घर श्रीमंतीच्या वैभवाने नटून दिसत असे.

पूर्वी खेड्यात घराच्या पहिल्याच दालनात जनावरांचा मोठा गोठा असायचा. घरात प्रवेश करताच पहिले दर्शन जनावरांचे होत असे. ज्या घरात जनावरे मुबलक असायची ते घर श्रीमंतीच्या वैभवाने नटून दिसत असे.

गायी, म्हशी, बैलांच्या जोड्या यांचा राबता जाणकार शेतकरी जीवापाड सांभाळत असत. शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांची रेलचेल शेतकऱ्यांच्या घरात घरभर होती. पाळीव कुत्राही जोडीला असायचाच, घरभर फिरणारे मांजर सर्वांच्या पायाला घासत फिरत असायचे.

गावाकडील हे सगळे आठवले की खेडूत जीवन किती समाधानाचे आहे याचा प्रत्यय येतो. खेड्यातील दिवाळी सण संपत आला की घराशेजारील परसात घातलेली अनेक पिकांची भेसळ उन्हाने करपून जायची. परसू रिकामे होत होते.

पावसाळा संपला की गायरीतील शेण टाकणे बंद होत असे. शेणखत तयार करण्यास अवकाश दिला जायचा. त्याच काळात गोठ्यातील शेणाचा ढीग परसात एका कोपऱ्यात साठवला जायचा. भला मोठा ढीग साठायला संक्रांत उजाडायची.

कडाक्याची थंडी पडायची आणि शेतातील हरभरे, वाटाणे, मसूर यांना फुलांचा बहर सजून दिसायचा. गावापासून विहिरी लांब होत्या. शेतवाडीतून पायवाटा तुडवत पाणी आणावे लागायचे, परसात कोळशिंदा पिवळ्या फुलांनी नटून जायचा.

त्याचे सौंदर्य डोळ्यात भरत असे. पण त्याचे काटे बोचरे, अंगभर पसरून जात असत. त्याचवेळी खेडूत बायका, पुरुष शेणाच्या गोवऱ्या थापण्याचा घाट घालत असत. 

शेणाचा ढीग गवताच्या चगाळाने झाकून ठेवत असत. तो उलगडून अडुळशाच्या फुलांनी सजवून नारळ वाढवीत असत. पाण्याची पहिली घागर ओतून शेण कालवण्याचा मान घरच्या कर्त्या पुरुषाला असायचा.

गावातील बायका, पुरुष घागरी घेऊन विहिरीला माळ लावत असत. पाण्याने भरलेल्या घागरी एकमेकांना आधार देत शेणावर ओतल्या जायच्या, चगाळ, कोंडा घालून शेणात कालवून काला करून घेत असत.

अशावेळी खेड्यातील लहान मुलांची मौज असायची, डोक्यावर थंडगार पाण्याच्या घागरी मोठी माणसे ओतत. अंग भिजून चिंब झालेले असायचे. बघता बघता गारा कालवून व्हायचा. गवताचा चगाळ परसात रिकाम्या जागेत अंथरला जात होता.

त्यानंतर सगळ्या बायका रांग धरून शेणी थापायला बसत. तासाभरात शेणाच्या गोवऱ्या माळभर लावल्या जायच्या, शेणाचा ढीग रिकामा व्हायचा, मग सर्वांची जेवणाची पंगत बसायची. ते जेवण अवीट गोडीचे असायचे. त्यात रंगत होती. त्या शेणाच्या गोवऱ्यात नाती टिकून होती.

समता आणि मायेचा पाझर खेड्यात खळखळून वाहत असायचा. गोवऱ्या पंधरा-वीस दिवसांत कडक उन्हात वाळत असायच्या. त्यांचा ढीग एकत्र करून खेडूत पद्धतीने त्यांची रचना करून त्यांचा हुडवा रचत असत. त्याला शेणाचे लिंपण लावून बंदिस्त केले जायचे, शिमगा, पाडवा हे सण मागे पडत.

पावसाळा सुरू होण्याअगोदर शेणी घरांच्या छपरात भरून ठेवल्या जायच्या, भर पावसात जळाऊ सरपण म्हणून गोवऱ्या शेतकऱ्यांचे धन होत असे. गोवऱ्या म्हणजे ग्रामसंस्कृतीचा कणा होता.

हरतऱ्हेने शेतीकामात वापर करून खेड्यांचे रुपडे अबाधित राखण्याचे काम करत होते. आज खेड्यात गोवऱ्या फारशा दिसत नाहीत. त्यांची जागा गोबरगॅसने घेतली आणि गोवऱ्या थापणारे एकतेचे, मायेचे हात नाहीसे झाले.

डॉ. पी. जे. कांबळेकणकवली

टॅग्स :शेतीशेतकरीसेंद्रिय खतगायसांस्कृतिक