पावसाळा सुरू झाला की खवय्ये चवदार, देशी मक्याच्या कणसांची आतुरतेने वाट पाहतात. भर पावसात भाजलेली गरम कणसे खाण्याचा आनंद काही निराळाच असल्याने या कणसांना खवय्यांची पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेकांची पावले सध्या मक्याची कणसे खाण्यासाठी चौकाचौकांत विक्री होत असलेल्या मुख्य रस्त्यांवर लागलेल्या गाड्यांकडे वळत आहेत.
सध्या भाजलेल्या किंवा उकडलेल्या मक्याच्या कणसांना लिंबू, लोणी, चीज, चाटची लज्ञ्जतही दिली जात आहे. ते बघता कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. स्वीट व देशी अशा दोन्ही मक्याच्या कणसांना मागणी वाढली आहे.
मका कणीस साधे २५ रुपये आणि लिंबू, चाट मसाला लावलेले मक्याचे कणीस ३० रुपयांना विकले जात आहे. पिझ्झा, बर्गर अथवा अन्य फास्ट फूड खाण्यापेक्षा तरुणाई मक्याची कणसे खाण्यास पसंती देत आहे.
त्यामुळे व्यावसायिकांना हंगामी व्यवसायाचे साधन उपलब्ध झाले आहे. यातून आम्हाला तीन महिने रोजगार उपलब्ध होतो, असे खामगाव येथील कणीस विक्रेत्यांनी सांगितले.
पोषक तत्त्वांचा खजिना
मक्याचे कणीस हे पोषक तत्त्वांनी भरलेले असते. मक्याच्या कणसात भरपूर पोषक तत्त्वे आहेत. यात ऊर्जा ९६ टक्के, पाणी ७३ टक्के, प्रथिने ३.४ ग्रॅम, कार्बोदके-२१ ग्रॅम, शर्करा - ४.५ ग्रॅम, तंतुमय पदार्थ - २.४ ग्रॅम व फॅट्स - १.५ ग्रॅम असतात.
उकडलेल्या कणसांनाही मागणी
उकडलेल्या कणसांनाही खवय्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सोबतच मक्याची कणसे घरी घेऊन जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. इतर पदार्थांपेक्षा सध्या याकडे कल वाढला आहे.
मक्याचे कणीस खाण्याचे अनेक फायदे
मक्याचे कणीस खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात लोहामुळे शरीरातील लोहाची उणीव भरून निघते. कोलेस्ट्रॉलसह विविध आजारापासून निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. लहान मुलांसाठीही फायदेशीर आहे. - डॉ. पूजा तेरेदेसाई, खामगाव.
हेही वाचा - खजुराचे पोषक तत्वे वाचून तुम्हीही म्हणाल; अबब अवघ्या एका खजुराचे किती हे गुणधर्म