गतवर्षी तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आल्याने भाव चांगला मिळाला. नोव्हेंबरमध्ये ११ हजार ५०० रुपयांवर भाव गेला होता. आता आठवड्यात नवीन तूर शेतकऱ्यांकडे उपलब्ध होणार आहे; परंतु आतापासूनच भावात घसरण सुरू झाली असून, ३० डिसेंबर रोजी सरासरी ७ हजार १७५ रुपये भाव मिळाला, तर सोयाबीनही पडत्या भावात विक्री करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पावसाच्या लहरीपणाचा फटका गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही खरिपाच्या पिकांना बसला. सोयाबीन, तुरीसह कपाशीची वाढ झाली नाही. त्यातच पिके ऐन भरात असताना किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सोयाबीनसह कपाशीच्या उत्पादनावर परिणाम झाला. आता तूर कापणीचे काम सुरू असून, गतवर्षीप्रमाणे यंदाही उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविली जात आहे, तर दुसरीकडे नवीन तूर बाजारात अजून येण्यास आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना आतापासूनच भावात घसरण सुरू झाली आहे.
सोयाबीनचे भाव स्थिर
हिंगोलीच्या मोंढ्यात सोयाबीनचे भाव वाढता वाढत नसल्याचे चित्र आहे. सरासरी पाच हजारांचा पल्लाही गाठत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. जवळपास दीड ते दोन महिन्यांपासून नवे सोयाबीन उपलब्ध झाले आहे; परंतु समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात ठेवले आहे; परंतु आता मिळेल त्या भावात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
हिंगोलीच्या मोंढ्यात २ नोव्हेंबर रोजी तुरीला १० हजार ९०० ते ११ हजार ६०० रुपये भाव मिळाला होता. भाव समाधानकारक मिळाल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत होते; परंतु त्यानंतर भावात सतत घसरण होत आहे.
नवी येण्याअगोदरच भावात घसरण
सध्या तूर कापणीची सर्वत्र लगबग सुरू असून, बाजारात मात्र नवी तूर येण्याअगोदरच भावात घसरण सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यंदा तुरीची वाढ झाली नसून, शेंगा पोखरणाऱ्या अळीचाही प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे; परंतु भावात होत असलेल्या घसरणमुळे चिंता व्यक्त होत आहे.