Join us

विहिरीसाठी चार लाखांचं अनुदान, अर्ज कसा व कुठे करायचा? 

By गोकुळ पवार | Published: December 09, 2023 2:18 PM

मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिरीसाठी लाभार्थी कुटुंबास तब्बल चार लाख रुपयांचा अनुदान दिल जाणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मनरेगाच्या माध्यमातून अनेक कामे केली जात आहेत. आता याच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिर खोदण्यासाठी चार लाख रुपयांचं अनुदान दिल जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. कुणा कुणाला हा लाभ मिळू शकतो? लाभ मिळण्यासाठी काय कागदपत्र आवश्यक? हे समजून घेऊयात. 

अलीकडेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बदल करण्यात आले असून त्यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आला आहे. या योजनेच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंबाला लाभ मिळाला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून तीन लाख 87 हजार 500 खोदणे शक्य आहे. मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किपायतीशीर वापर गेल्यास अनेक कुटुंबांना याचा फायदा होऊ शकतो. यास उद्देशातून मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिरीची काम सुरू करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर लाभार्थी कुटुंबास तब्बल चार लाख रुपयांचा अनुदान दिला जाणार आहे.

इथं पहा काय काय आवश्यक? 

दरम्यान या योजेनच्या लाभधारकांच्या निवडीसाठी शासन निर्णयानुसार निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार लाभधारक हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे, विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत शेतजमीन), अल्प भूधारक शेतकरी (5 एकरपर्यंत शेतजमीन) या निकषांवर निवड केली जाईल. तर पात्रतेसाठी अर्जदाराकडे 1 एकर शेतजमीन सलग असावी. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येईल. दोन विहिरींमध्ये 150 मीटर अंतराची अट अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही आणि खासगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही. लाभधारकाच्या सातबाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये. एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजे 8-अ उतारा असावा. एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील, एकूण जमिनीचं सलग क्षेत्र 1 एकरपेक्षा जास्त असावं. महत्वाचं म्हणजे अर्जदार हा जॉब कार्डधारक असला पाहिजे.

अर्ज कुठे व कसा करायचा?

तसेच या योजेनचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यासाठी मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे. म्हणजेच शासनाने जारी केलेल्या जीआर सोबत एक अर्जाचा नामना देण्यात आला आहे. हा नमुना साध्या कागदावर लिहून तुम्ही अर्ज करू शकता. तसेच अर्जासोबत संमतीपत्र सुद्धा द्यायचं आहे. यासाठी अर्जासोबत सातबाराचा ऑनलाईन उतारा, 8-अ चा ऑनलाईन उतारा, मनरेगा जॉब कार्डची प्रत, सामुदायिक विहीर घ्यायची असल्यास सर्व जण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा आणि समोपचारानं पाणी वापराबाबतचं सर्वांचं करारपत्र जोडावा लागेल. 

टॅग्स :शेतीनाशिकपाणी