केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करावा, हंगाम २०२२-२३ हंगामातील उर्वरित प्रतिटन १०० रुपये हप्ता द्यावा, यासाठी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता.
याची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिष्टाई करत तीन ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक लावली आहे. तसे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले.
संघटनेने गतवर्षीच्या आंदोलनात २०२२-२३ या हंगामातील गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याबाबत तोडगा निघाला होता. या प्रस्तावाला शासनाने मान्यता न दिल्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत.
गेल्या १० महिन्यांपासून मुख्य सचिवांकडे प्रस्ताव दाखल केला आहे. याचा निषेध म्हणून मंत्री अमित शाह व राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन करण्यात येणार होते.
या पार्श्वभूमीवर बुधवारी पहाटेपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली व कोल्हापुरातील ८०० हून अधिक कार्यकर्त्यांना गुन्हा दाखल करण्याबाबत नोटीस देऊन ताब्यात घेण्यात आले.
या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ३ ऑक्टोबरच्या आत बैठक लावून २०२२-२३ मधील गाळप झालेल्या उसाला १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डर १९६६ नुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करण्याचा सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत सांगितले. या चर्चेनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
पोलिस अधीक्षकांची शेट्टी यांनी घेतली भेट
• केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याापूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुमारे ८०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
• याबाबत जाब विचारण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी दुपारी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी भेट घेतली.
• कार्यकर्त्यांची सुटका करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, मंत्री शाह यांचा दौरा पूर्ण होताच कार्यकर्त्यांना सोडणार असल्याचे अधीक्षक पंडित यांनी सांगितले.